पुढील बातमी

IND vs SA 2nd test Day 1 : पहिल्या दिवसाअखेर भारत ३ बाद २७३ धावा

IND vs SA 2nd test Day 1 : पहिल्या दिवसाअखेर भारत ३ बाद २७३ धावा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यातील कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर मयंक अग्रवाल आणि रोहित शर्माने भारताच्या डावाला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडा आणि फिलँडरने सुरुवातीला अचूक मारा करत भारतीय सलामीवीरांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 

रबाडाने रोहित शर्माला अवघ्या १४ धावांवर तंबूत धाडत भारताला पहिला धक्का दिला. १ बाद २५ धावा अशी परिस्थिती असताना चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला. सलामीवीर मंयकने त्याच्या साथीने भारताचा डाव सावरला. दोघांनी १३८ धावांची भागीदारी केली. ही जोडी सेट होत आहे असे वाटत असताना रबाडाने पुजाराला माघारी धाडत आफ्रिकेला आणखी एक मोठे यश मिळवून दिले. पुजाराने ११२ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५८ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या बाजूला मयंकने कसोटी कारकिर्दीतील आपले दुसरे शतक पूर्ण केले. १०८ धावांवर असताना रबाडाने त्याला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.

त्यानंतर विराट कोहलीने अजिंक्य रहाणेच्या साथीने डावाला आकार दिला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली असून विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. अंधूक प्रकाशामुळे पहिल्या दिवसांचा खेळ ८५.१ षटकानंतर थांबवण्यात आला. यावेळी भारताच्या धावफलकावर ३ बाद २७३  धावा होत्या. विराट कोहली १०५ चेंडूत १० चौकारांसह ६३ आणि अजिंक्य रहाणे ७० चेंडूत ३ चौकारांसह १८ धावांवर नाबाद होते. 
  

Thu, 10 Oct 2019 04:48 PM IST

पहिल्या दिवसाअखेर भारत ३ बाद २७३ धावा

विराट कोहली ६३(१०५)*

अजिंक्य रहाणे १८ (७०)* 

Thu, 10 Oct 2019 04:19 PM IST

कोहलीने चौकाराने साजरे केले अर्धशतक

फिळँडरच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार खेचत विराटने अर्धशतक पूर्ण केले

Thu, 10 Oct 2019 04:14 PM IST

कोहली-रहाणे यांच्यात ५० धावांची भागीदारी

कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी ११४ चेंडूत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली

Thu, 10 Oct 2019 03:06 PM IST

शतकी खेळीनंतर मयंक माघारी, भारताला तिसरा धक्का

रबाडाने मयंक अग्रवालला झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. मयंकने १९५ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०८ धावांचे योगदान दिले.

Thu, 10 Oct 2019 02:18 PM IST

चहापानापर्यंत भारत २ बाद १६८ धावा (५३)

मयंक अग्रवाल ८६(१७१)*
विराट कोहली ०(४)*

Thu, 10 Oct 2019 12:59 PM IST

मयंक अग्रवालचे अर्धशतक पूर्ण

मयंक अग्रवालने आपली शानदार खेळी कायम ठेवत या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले आहे. मयंक अग्रवालने ५२ धावा तर सोहित शर्माने १४ धावा केल्या आहेत. सध्या भारतीय संघाने या सामन्यात शतक पूर्ण केले आहे.  

Thu, 10 Oct 2019 12:01 PM IST

भारत १ बाद ७७ धावा

पहिल्या सत्रापर्यंत भारताने एक गडी गमावत ७७ धावा पूर्ण केल्या आहेत.

Thu, 10 Oct 2019 11:58 AM IST

भारत आणि दक्षिण अफ्रिका टीम

भारतीय संघ - रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, उमेश यादव, वृद्धिमान साहा, रविंद्र जडेजा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

दक्षिण आफ्रिका संघ - डीन एल्गर, एडेन मार्कराम, थ्युनिस डि ब्र्यून, टेम्बा बावुमा, फैफ डुप्लेसी (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सेनुरन मुथुसामी, वर्नोन फिलेंडर, केसव महाराज, कगिसो रबाडा, एरिक नॉर्टजे

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IND vs SA 2nd test Day 1 : पहिल्या दिवसाअखेर भारत ३ बाद २७३ धावा