पुढील बातमी

#INDvNZ : भारत आउट! न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये

#INDvNZ : भारत आउट! न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये

मँचेस्टर येथील ओल्ड ट्रँफर्डच्या मैदानात न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. न्यूझीलंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आघाडी बारगळल्यानंतर जडेजाने भारताच्या आशा पल्लवित केल्या. पण तो बाद झाल्यानंतर भारताच्या आशा संपुष्टात आल्या. जडेजा बाद झाल्यानंतर धोनीने आक्रमक अंदाज दाखवत या सामन्यात धोनी पुन्हा फिनिशींग टच देणार असे वाटत असताना गप्टिलने उत्कृष्ट क्षेत्रक्षणाचा नमुना दाखवून देत धोनीला धावबाद केले आणि सामना पुन्हा न्यूझीलंडच्या बाजूने फिरवला.  

सलामीवीर रोहित शर्मा (१), विराट कोहली (१) आणि लोकेश राहुल (१) बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकच्या रुपात भारताला चौथा धक्का बसला. लयीत दिसणाऱ्या पंतला ३२ धावांवर माघारी धाडत सँटनरने भारताला बॅकफूटवर ढकलले. सँटनरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात हार्दिक पांड्याने कर्णधार विल्यम्सनच्या हाती झेल दिला. त्याने  ६२ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रविंद्र जडेजाने धोनीच्या साथीनं डावाला आकार दिला. जडेजाने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देत सामना भारताच्या बाजूने केला. पण बोल्टने मोक्याच्याक्षणी विल्यम्सकरवी त्याला झेलबाद केले. त्याच्यापाठोपाठ धोनी ७२ चेंडूत ५० धावांची खेळी करुन धावबाद झाला. फर्गुयसनने भुवीला खातेही खोलू दिले नाही. अखेरच्या षटकात युजवेंद्र तहलला यष्टिरक्षक लॅथमकरवी झेलबाद करत नीशमने न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

टेलर आणि लॅथम जोडीने राखीव दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. टेलर ७४ धावांवर धावबाद झाल्यानंतर भुवनेश्वरने १० धावांवर खेळणाऱ्या लॅथमला चालते केले. त्यानंतर मैदानात आलेला मॅट हेन्री अवघ्या एका धावेची भर घालून माघारी फिरला. त्यानंतर न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकात २३९ धावांपर्यंत मजल मारली.    

केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने ४६.१ षटकात ५ बाद २११ धावा वरुन असताना थांबवण्यात आलेला खेळाला राखीव दिवसात वेळेवर सुरुवात झाली. न्यूझीलंडने अखेरच्या षटकात तीन विकेट्स गमावत २८ धावांची भर घातली. तत्पूर्वी सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोलस या जोडीने न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात केली. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने स्फोटक सलामीवीर गप्टिलला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. स्लीमध्ये कर्णधार विराट कोहलीने त्याचा झेल टिपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या केन विल्यम्सनने निकोलसच्या साथीने डाव सावरला.

या दोघांनी संयमी खेळी करत भागीदारी वाढविण्यावर भर देत संघाला पहिल्या धक्क्यातून सावरले ही जोडी फोडण्याचे भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण झाले असताना रविंद्र जडेजाने निकोलसला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. विल्यम्सनने ८५ चेंडूत ३ चौकार आणि १ चौकाराच्या मदतीने ६७ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि जेम्स नीशमने संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जेम्सला बाद करत हार्दिक पांड्याने न्यूझीलंडला पुन्हा बॅफूटवर ढकलले. दरम्यान रॉस टेलरने आपले अर्धशतक साजरे केले. चौथा गडी तंबूत परतल्यानंतर मैदानात आलेल्या कॉलीन डी ग्रँडहोमे १६ धावांची भर घालून भुवीचा शिकार झाला.  

Wed, 10 Jul 2019 07:48 PM IST

भारत : सर्व बाद २२१ (४९.३)

रविंद्र जडेजा ७७ (५९)

महेंद्रसिंह धोनी ५० (७२)

मॅट हेन्री ३/३७

Wed, 10 Jul 2019 07:29 PM IST

भारताला पराभूत करत न्यूझीलंड फायनलमध्ये

न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.नीशमने चहलला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

Wed, 10 Jul 2019 07:24 PM IST

लॉकी फर्ग्युसनने भुवीला केलं क्लिन बोल्ड

भुवी खातेही न उघडता माघारी

Wed, 10 Jul 2019 07:19 PM IST

धोनी धावबाद, भारताच्या विजयाच्या आशा संपल्या

चोरटी धाव घेण्याच्या नादात धोनी धावबाद, गप्टिलचा अप्रतिम क्षेत्ररक्षण

Wed, 10 Jul 2019 07:16 PM IST

जडेजा बाद, भारताला सातवा धक्का!

जडेजाने ५९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

Wed, 10 Jul 2019 06:43 PM IST

रविंद्र जडेजाच अर्धशतक!

रविंद्र जडेजाने महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीन भारताच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

Wed, 10 Jul 2019 06:30 PM IST

जडेजा-धोनी जोडीमध्ये अर्धशतकी भागीदारी

महेंद्रसिंह धोनी आणि जडेडजा यांनी ५० धावांची भागीदारी पूर्ण केली

Wed, 10 Jul 2019 06:03 PM IST

जडेजाच्या बॅटमधून भारताच्या डावाचा पहिला षटकार!

नीशमच्या गोलंदाजीवर जडेजाने उत्तुंग षटकार, भारताने पार केला शंभर धावांचा टप्पा 

Wed, 10 Jul 2019 05:50 PM IST

हार्दिक पांड्या झेलबाद, भारताला सहावा धक्का

सँटनरने हार्दिक पांड्याला बाद करत भारताचे टेन्शन आणखी वाढवले आहे. हार्दिक पांड्याने ५६ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या. भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या पंत एवढ्या धावा करुन तो माघारी फिरला आहे.

Wed, 10 Jul 2019 05:44 PM IST

भारताची मदार धोनी-हार्दिक पांड्यावर

LIVE: Hardik Pandya, MS Dhoni look to rebuild chase

Wed, 10 Jul 2019 05:23 PM IST

भारताला पाचवा धक्का, पंत माघारी!

सँटनरने पंतला बाद करत भारताला दिला पाचवा धक्का, पंतने ५६ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३२ धावांची खेळी केली. भारताकडून सामन्यातील आतापर्यंतची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

Wed, 10 Jul 2019 05:10 PM IST

पंत-पांड्या जोडी स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे.

पंत आणि हार्दिक पांड्या भारतीय डाव सावरण्याच प्रयत्न करत आहे.

Wed, 10 Jul 2019 04:21 PM IST

दिनेश कार्तिकही माघारी, भारताला चौथा धक्का

मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर नीशमने दिनेश कार्तिकचा अप्रतिम झेल टिपला. कार्तिकने २५ चेंडूत ६ धावा केल्या

Wed, 10 Jul 2019 03:51 PM IST

लोकेश राहुलच्या रुपात भारताला तिसरा धक्का!

मॅट हेन्रीने लोकेश राहुललाही धाडले माघारी 

Wed, 10 Jul 2019 03:46 PM IST

कोहलीही माघारी! भारताला दुसरा धक्का

बोल्टने विराट कोहलीला पायचित करत भारताला दुसरा धक्का दिला आहे. 

Wed, 10 Jul 2019 03:44 PM IST

लोकेश राहुल आणि कर्णधार कोहलीवर भारताची मदार

लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली मैदानात असून त्यांच्यामध्ये भागीदारी होणे गरजेचे आहे.

Wed, 10 Jul 2019 03:42 PM IST रोहित शर्मा

भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

मॅट हॅन्रीने रोहित शर्माला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले

Wed, 10 Jul 2019 03:23 PM IST

न्यूझीलंड ८ बाद २३९ धावा

रॉस टेलर : ७४ (९०)

विल्यम्सन ६७ (९५)

भुवनेश्वर कुमार  ३/४३

Wed, 10 Jul 2019 03:18 PM IST

मॅट हेन्रीच्या रुपात भुवीने न्यूबझीलंडला दिला आठवा धक्का!

अखेरच्या षटकातील दोन बळींसह भुवीने सामन्यात तिसरा गडी बाद केला.  

Wed, 10 Jul 2019 03:12 PM IST

रॉस टेलर पाठोेपाठ लॅथमही बाद, न्यूझीलंडचा सातवा गडी तंबूत

भुवनेश्वरच्या षटकात उत्तुंग फटका मारण्याच्या नादात लॅथम माघारी, सीमारेषेवर जडेजाने टिपला अप्रतिम झेल

Wed, 10 Jul 2019 03:09 PM IST

टेलर धावबाद! न्यूझीलंडला सहावा धक्का

Wed, 10 Jul 2019 03:06 PM IST

राखीव दिवसातील खेळाला सुरुवात!

भुवीने उर्वरित षटक केले पूर्ण

Tue, 09 Jul 2019 11:26 PM IST

भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या दुपारी ३ वाजल्यापासून सामना पुन्हा सुरु होणार

पावसाच्या व्यत्ययामुळे थांबण्यात आलेला सामना अखेरपर्यंत सुरु होऊ शकला नाही. फायनलमध्ये कोणता संघ वर्णी लावणार यासाठी आता बुधवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Tue, 09 Jul 2019 10:50 PM IST

पावसाला पुन्हा सुरुवात, खेळ राखीव दिवसाच्या दिशेने!

कव्हर्स हटवल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे मैदान पुन्हा कव्हर्सखाली! सामना राखीव दिवसांत खेळवण्यात येणार असल्याचे संकेत 

Tue, 09 Jul 2019 10:05 PM IST

कव्हर्स काढण्यात आले आहेत, पण खेळ सुरु होण्याबाबत संभ्रम

पावसाच्या विश्रांतीनंतर कव्हर्स काढण्यात आले आहेत.  ११ वाजून ५ मिनिटांपर्यंत प्रतिक्षा केली जाईल. सामना पुढे खेळवला गेला तर डकवर्थ लुईस प्रमाणे भारतासमोर लक्ष्य दिले जाईल. आज सामना होऊ शकला नाही तर उद्या to be continue असे चित्र पाहायला मिळेल.

Tue, 09 Jul 2019 06:42 PM IST

पावसामुळे खेळात व्यत्यय, न्यूझीलंड ५ बाद २११ (४६.१)

रॉस टेलर : ६७ (८५) 

टॉम लॅथम : ३(४)

Tue, 09 Jul 2019 06:23 PM IST

भुवीला पहिले यश, न्यूझीलंडचा पाचवा गडी तंबूत

भुवनेश्वर कुमारच्या उसळत्या चेंडूला छेडखानी करण्याच्या नादात कॉलिन डी ग्रँडहोमेनं गमावली विकेट, धोनीने यष्टिमागे टिपला झेल. त्याने २ चौकाराच्या मदतीने १० चेंडूत १६ धावा केल्या. 

Tue, 09 Jul 2019 06:06 PM IST

पांड्याने न्यूझीलंडला दिला चौथा धक्का

हार्दिक पांड्याच्या षटकात उत्तुंग फटका खेचण्याच्या नादात नीशम माघारी, दिनेश कार्तिकने सीमारेषेवर टिपला झेल, नीशमने १८ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने १२ धावा केल्या.

Tue, 09 Jul 2019 05:39 PM IST केन विल्यम्सन माघारी

कर्णधार विल्यम्सन चहलच्या जाळ्यात, न्यूझीलंडला तिसरा धक्का

कर्णधार केन विल्यम्सनला बाद करत चहलने भारताला तिसरे यश मिळवून दिले. विल्यम्सननं ९५ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली. 

Tue, 09 Jul 2019 05:20 PM IST

अरे देवा! 'टेलरच्या झेलची संधी हुकली...

टेलरला झेलबाद करण्याची संधी हुकली, बुमराहच्या षटकात धोनी चेंडूपर्यंत पोहचला नाही म्हणा किंवा चेंडू धोनीपर्यंत पोहचला नाही म्हणा...पण  झेल अवघड असला तरी या विकेटमुळे न्यूझीलंड आणखी बॅकफूटवर गेले असते.

Tue, 09 Jul 2019 05:12 PM IST

विराटचा थ्रो अचूक बसला असता तर विल्यम्सनचा खेळ तेव्हाच थांबला असता

Tue, 09 Jul 2019 05:02 PM IST

विल्यम्सन-टेलर मैदानात

कर्णधार केन विल्यम्सन संयमीपणे फलंदाजी करत टेलरच्या साथीने डावाला आकार देत आहे. 

Tue, 09 Jul 2019 04:30 PM IST

जडेजाने निकोलसला धाडले माघारी

जडेजाने निकोलसला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. निकोलसने ५१ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २८ धावा केल्या

Tue, 09 Jul 2019 04:11 PM IST

निकोलस-विल्यम्सन जोडी जमली

पहिल्या धक्क्यातून सावरत निकोलस-विल्यम्सन जोडीने अर्धशतकी भागीदारी करत न्यूझीलंडने १४ व्या षटकात ५० धावांचा टप्पा पार केला आहे. ही जोडी फोडून न्यूझीलंडवर दबाव निर्माण करण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे. यासोबतच न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनने स्पर्धेत ५०० धावांचा टप्पाही पार केला.

Tue, 09 Jul 2019 03:41 PM IST निकोलस

आठव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला मिळाला पहिला चौकार

बुमराहच्या अखेरच्या चेंडूवर हेन्री निकोलचचा खणखणीत चौकार

Tue, 09 Jul 2019 03:39 PM IST

निकोलस-विल्यम्सन जोडी मैदानात

कर्णधार विल्यम्सन या स्पर्धेत चांगला फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्ध तो कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Tue, 09 Jul 2019 03:25 PM IST बुमराह

भारताला पहिले यश, बुमराहने मार्टिन गप्टिलला धाडले माघारी

जसप्रीत बुमराहने सलामीवीर मार्टिन गप्टिलला अवघ्या १ धावेवर धाडले माघारी

Tue, 09 Jul 2019 02:59 PM IST

भारतीय संघात एकमेव बदल

भारतीय संघात कुलदीपच्या जागी चहलला संधी देण्यात आली आहे.

Tue, 09 Jul 2019 02:58 PM IST

केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकली!

न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:#INDvNZ : भारत आउट! न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये