पुढील बातमी

CBI कोर्टाचा मोठा निर्णय, पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी

 CBI कोर्टाचा मोठा निर्णय, पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय कोर्टाने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआय २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. सीबीआयने बुधवारी रात्री उशीराने त्यांच्या अटकेची कारवाई केली होती. या प्रकरणातील सुनावणीसाठी गुरुवारी पी चिदंबरम यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. पी. चिदंबरम या प्रकरणातील चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचे सांगत सीबीआयचे वकील तुषार मेहता यांनी ५ दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती. सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीशांनी अखेर चिदंबरम यांना चौकशीसाठी सीबीआय कोठडी सुनावली. 

पीटर, इंद्राणी मुखर्जीला कधीच भेटलो नाही : कार्ती चिदंबरम

अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांची बाजू मांडली. सीबीआय कोर्टाने वकील आणि चिदंबरम यांच्या नातेवाईकांना रोज ३० मिनिटं भेटण्याची संमती दिली आहे. पी चिदंबरम हे चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला होता. मात्र कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी हा दावा खोडून काढला. चिदंबरम यांना जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणात अडकवलं जातं आहे. त्यांनी आत्तापर्यंत चौकशीला वारंवार सहकार्य केलं आहे. तरीही त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. कालपासून ते झोपलेले नाहीत, त्यांना त्रास दिला जातो आहे असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.

चिदंबरम यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी म्हटले होते की, या प्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. ते पुढे म्हणाले परदेशी गुंतवणूक मंडळातील (FIPB)  ६ सरकारी सचिवांचा देखील यात समावेश होता. मात्र सीबीआयने यापैकी कोणालाही अटक केलेली नाही. चिदंबरम यांनी २४ तासांची मागितलेली मुदतही नाकारण्यात आली. याप्रकरणातील तपासणी पूर्ण झाली आहे. आरोपपत्राचा आराखडा देखील तयार आहे. परंतु आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. सीबीआय चिदंबरम यांना अटक करण्यासाठी ऐवढे उतावीळ का आहे समजत नाही, असा प्रश्न चिदंबरम यांचे दुसरे वकील अभिषक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला होता. सीबीआयला चूकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

प्रकरण नेमकं काय आहे

पी. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडियामध्ये ३०५ कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीचं हे प्रकरण आहे. मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक स्वीकारण्यासाठी आयएनएक्स मीडियाला Foreign Investment Promotion Board (FIPB) कडून देण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये अनियमितता आढळून आल्याचा आरोप पी. चिदंबरम यांच्यावर आहे.
 

Thu, 22 Aug 2019 05:27 PM IST

CBI कोर्टाने पी. चिदंबरम यांच्या कोठडी संदर्भातील निर्णय सुरक्षित ठेवला

सीबीआयचे वकील तुषार मेहता यांनी पी.चिदंबरम यांना ५ दिवसांची काठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. कोर्टाने हा निर्णय सुरक्षित ठेवला आहे.

Thu, 22 Aug 2019 05:20 PM IST

चिदंबरम यांच्या वकिलांनी सीबीआयचा आरोप फेटाळला

चिदंबरम चौकशी संदर्भात सहकार्य करत नसल्याचा सीबीआयने केलेला आरोप चिदंबरम यांचे वकील सिंघवी यांनी फेटाळला

Thu, 22 Aug 2019 04:51 PM IST

हे प्रकरण संपूर्णपणे इंद्राणी मुखर्जीच्या साक्षीच्या आधारावर

सीबीआयने पी. चिदंबरम यांच्यावर केलेली कारवाई पूर्णपणे इंद्राणी मुखर्जीच्या साक्षीच्या आधारावर आहे, अशी बाजू चिदंबरम यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडली.

Thu, 22 Aug 2019 04:51 PM IST

सिब्बल यांच्याकडून पाच दिवसांच्या कोठडीला विरोध

सीबीआयने चौकशीसाठी 5 दिवसांची कोठडीसंदर्भात केलेल्या मागणीला चिदंबरम यांचे वकील सिब्बल यांनी विरोध दर्शवला आहे. 

Thu, 22 Aug 2019 04:07 PM IST

पी. चिदंबरम यांनी चौकशीसंदर्भा सहकार्य केलं नाही : सीबीआय

पी. चिदंबरम यांनी चौकशी दरम्यान कोणत्याही प्रकारे सहकार्य केले नाही, असा युक्तिवाद सीबीआयने कोर्टामध्ये केला असून चौकशीसाठी ५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.

Thu, 22 Aug 2019 03:28 PM IST

पी. चिदंबरम यांना कोर्टात हजर करण्यात आले

पी. चिदंबरम यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. युक्तीवादानंतर त्यांची डोकेदुखी वाढणार की दिलासा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Thu, 22 Aug 2019 03:23 PM IST

कडेकोट पोलीस बंदोबस्त

पी. चिदंबरम यांच्या अटकेच्या कारवाईवेळी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी चांगलाच गदारोळ केला होता. याच पार्श्वभूमीवर सीबीआय कोर्ट परिसरात आज मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Thu, 22 Aug 2019 03:16 PM IST पी. चिंदबरम यांना सीबीआयच्या कोर्टात हजर करण्यात येणार

थोड्याच वेळात पी. चिदंबरम यांना कोर्टात हजर करण्यात येणार

 सीबीआय पथक पी. चिदंबरम यांच्यासह कोर्टाच्या दिशेने रवाना झाले आहे.

Thu, 22 Aug 2019 03:11 PM IST

काँग्रेसला लक्ष करण्याच्या हेतून कारवाई

पी. चिंदबरम यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही काँग्रेसवर लक्ष करण्यासाठी करण्यात आली आहे, असे मत काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

Thu, 22 Aug 2019 03:09 PM IST

चिदंबरम यांची पत्नी आणि मुलगाही कोर्टात उपस्थित

सुनावणीसाठी पी. चिदंबरम यांना कोर्टात हजर करण्यापूर्वीच त्यांची पत्नी आणि मुलगा हे कोर्टामध्ये पोहचले आहेत.

Thu, 22 Aug 2019 03:06 PM IST

पी. चिदंबरम यांचे वकील कोर्टात पोहचले

आयएनएक्स प्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली होती. त्यांना आज सीबीआय कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. चिदंबरम यांचे वकील कोर्टात पोहचले आहेत. 

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: CBI कोर्टाचा मोठा निर्णय, पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी