Zakir Hussain : ज्यावर कोणताच उपचार नाही, अशा आजाराने घेतला झाकिर हुसेन यांचा जीव! जाणून घ्या या आजारबद्दल...
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Zakir Hussain : ज्यावर कोणताच उपचार नाही, अशा आजाराने घेतला झाकिर हुसेन यांचा जीव! जाणून घ्या या आजारबद्दल...

Zakir Hussain : ज्यावर कोणताच उपचार नाही, अशा आजाराने घेतला झाकिर हुसेन यांचा जीव! जाणून घ्या या आजारबद्दल...

Dec 16, 2024 12:07 PM IST

Idiopathic Pulmonary Fibrosis Disease : प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन झाले. त्यांना इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस असल्याचे निदान झाले होते. हा आजार काय आहे हे माहीत आहे का?

झाकिर हुसैन
झाकिर हुसैन

Zakir Hussain Death Reason : उस्ताद झाकिर हुसेन यांचे सोमवारी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर तीन आठवडे उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. प्राथमिक अहवालानुसार त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होती. मात्र, झाकिर हुसेन यांना इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. हा आजार असा आहे की, ज्यावर आजपर्यंत कोणताही उपचार नाही. काय आहे हा आजार जाणून घेऊया…

काय आहे ‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’ हा आजार?

‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस’ हा एक फुफ्फुसांचा आजार आहे. यामध्ये फुफ्फुसाच्या ऊतींमध्ये फायब्रोसिस अर्थात जखमसदृश डाग निर्माण होतो. त्यामुळे फुफ्फुसांची वायुकोशीय भिंत जाड होऊन तिथपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यात अडचण येते. हळूहळू फुफ्फुसांची ऑक्सिजन घेण्याची क्षमता कमी होते. या आजारावर अद्याप कोणताही इलाज डॉक्टरांना आणि संशोधकांना सापडलेला नाही. मात्र, या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि यापासून दूर राहण्यासाठी काही औषधे दिली जातात.

कुणाला होतो हा आजार?

इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा आजार प्रामुख्याने ५० वर्षांवरील लोकांना होतो. परिस्थिती हळूहळू बिघडत जाते. सुरवातीला कोरडा खोकला लक्षणात्मक दिसतो. हा आजार जसजसा वाढत जातो तसतसे कष्ट करताना, व्यायाम करताना किंवा चढताना श्वास घेण्यास त्रास होतो. आयपीएफ रुग्णांना अनेकदा थकवाही जाणवतो. अनेकवेळा नखे जाड दिसू लागतात, ज्याला नेल क्लबिंग म्हणतात.

Zakir Hussain: 'तालसेन' हरपला! विश्वविख्यात तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन

इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसची प्रारंभिक लक्षणे:

> श्वास घेण्यात अडचण.

> सतत कोरडा खोकला येणे, जो उपचारानंतरही सुधारत नाही.

> सामान्य कामे करतानाही थकवा जाणवणे.

> काही रुग्णांना छातीत जडपणा किंवा घट्टपणा जाणवतो.

> कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे.

> शारीरिक हालचाली करताना श्वास लागणे.

> रात्री ताप आणि घाम येणे.

जोखीमीचे घटक

> धूम्रपान

> कौटुंबिक इतिहास

> ऑटो इम्यून डिसीज

> व्हायरल इन्फेक्शन

> वय ६० ते ७० वर्षांच्या वयात हा धोका जास्त असतो.

कसा कराल स्वतःचा बचाव?

> वर्षभरात एकदा फ्लू आणि न्यूमोनियाची लस घ्या.

> दररोज व्यायाम करा.

> धूम्रपान थांबवा

> निरोगी आणि संतुलित आहार घ्या.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner