Yoga Poses For Knee Pain: हिवाळ्यात गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. विशेषत: ज्यांना संधिवात किंवा इतर सांधे-संबंधित समस्या आहेत, त्यांना याचा त्रास अधिक होतो. थंड हवामानात रक्ताभिसरण कमी होते, ज्यामुळे गुडघ्याच्या आसपासच्या स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना वाढू शकतात. अशा परिस्थितीत योग हा एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो. योगामुळे केवळ शारीरिक लवचिकता वाढते असे नाही तर स्नायू आणि सांधे देखील मजबूत होतात. विशेषतः वज्रासन, बालासन आणि पवनमुक्तासन यांसारखी आसने गुडघ्यांसाठी फायदेशीर मानली जातात. ही आसने गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत करतात, ज्यामुळे वेदना कमी होते आणि लवचिकता वाढते. याशिवाय योगामुळे शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते, ज्यामुळे हिवाळ्यात सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया ही आसने कशी करतात...
बालासन करण्यासाठी सर्वप्रथम पाय वाकवून वज्रासनात बसा. यानंतर, आपले दोन्ही हात वर घ्या आणि पुढे वाकवा. त्यानंतर आपले हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. यानंतर, आपले डोके देखील पूर्णपणे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा.
‘पवनमुक्तासन’ करण्यासाठी सर्व प्रथम, आपल्या पाठीवर उताणी झोपा आणि आपले दोन्ही पाय एकत्र सरळ करा. आता तुमचा उजवा गुडघा तुमच्या छातीजवळ आणा. मांडी पोटापर्यंत आणा आणि त्यावर चांगला दाब येऊ द्या. आता तुमच्या हनुवटीला तुमच्या उजव्या गुडघ्याने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घ्याल, तेव्हा तुमचे गुडघे हाताने घट्ट धरा. जर तुम्ही तुमच्या हाताने गुडघा व्यवस्थित धरला, तर तुम्हाला छातीवर थोडासा दाब जाणवेल, जो सामान्य आहे. आता श्वास सोडा आणि गुडघे मोकळे करा. आता अशी संपूर्ण प्रक्रिया डाव्या पायाने करा. दोन्ही पायांनी एकदा केल्यावर पुन्हा एकदा दोन्ही पायांनी एकत्र देखील करा.
‘वज्रासन’ हे आसन करण्यासाठी तुम्हाला तुमचे गुडघे मागे वाकवावे लागतील. त्यानंतर तुमचा नितंब तुमच्या टाचांवर ठेवा. यानंतर, डोके, मान आणि मणक्याला एका सरळ रेषेत ताठ ठेवा आणि आपल्या हाताचे तळवे आपल्या मांडीवर ठेवा.
या काही आसनांमुळे तुम्हाला गुडघेदुखीपासून आराम मिळू शकतो. मात्र, त्यासोबतच अनेक इतर समस्यांमधून देखील आराम मिळू शकतो. योग हा शरीराचं संतुलन योग्य राखण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते.
संबंधित बातम्या