Yoga Pose for Weight Loss and Belly Fat: आजकाल बहुतांश व्यक्तींना वजन वाढण्याची समस्या त्रास देत आहे. सतत बसून काम करणे, व्यस्ती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणिी खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अशा कितीतरी कारणांमुळे वजन वाढते. तर कधी कधी पीसीओएसमुळे सुद्धा वजन वाढू लागते. अभ्यासानुसार सुमारे २० टक्के भारतीय महिला पीसीओएसने ग्रस्त आहेत. या समस्येमुळे महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता, फेशियल हेअर आणि वजन वाढणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. ही समस्या स्ट्रिक्स डायट आणि शारीरिक हालचालींच्या मदतीने नियंत्रित केली जाऊ शकते. अशा ३ योगासनांबद्दल जाणून घेऊया जे पोटाभोवती जमा झालेली चरबी, वजन कमी करून पीसीओएसच्या समस्या कमी करण्यास सुद्धा मदत करतात.
मलासन करण्यासाठी सर्वप्रथम गुडघे वाकवून शौचास बसतो तसे बसा. यानंतर आपल्या दोन्ही हातांच्या बगलांना आपल्या वाकलेल्या गुडघ्यावर ठेवा. आपल्या हातांचे तळवे एकत्र जोडून हात नमस्कार मुद्रा करा. हे आसन करताना हळू हळू श्वास घेत राहा. काही वेळ या स्थितीत बसून दीर्घ श्वास घ्या. यानंतर नमस्काराच्या आसनात हात वरच्या दिशेने घ्या, त्याच आसनात हात परत आणा आणि हात उघडताना हळू हळू उठून घ्या. ही मुद्रा सकाळी रिकाम्या पोटी १० मिनिटे केल्यास फायदा होतो.
हे आसन करण्यापूर्वी मणक्याची तयारी करावी लागते, अन्यथा मणक्यावर अचानक ताण येऊ शकतो. भुजंगासन करण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही पाय समोर पसरवून पाठीचा कणा वार्मअप करण्यासाठी बसा. आता पाठ वाकवताना दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. यानंतर हे आसन करायला सुरुवात करा. दोन्ही हात खांद्याजवळ ठेवा. तुमची कोपर वाकलेले असावे. पोटाचा खालचा भाग जमिनीवर ठेवावा व शरीराचा वरचा भाग हाताने वर करून वरच्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करा. काही काळ या स्थितीत राहून पूर्वीच्या स्थिती पुन्हा या. सुरुवातीला हे आसन ३० सेकंद करावे. नंतर हळूहळू वेळ वाढवत १ मिनिटापर्यंत वाढवू शकता.
सेतूबंधनासन करण्यासाठी प्रथम तुमच्या पाठीवर झोपा. तुमचे गुडघे तुमच्या पायांच्या समांतर आणा आणि त्यांना खांद्याच्या पातळीच्या अंतरावर वाकवा. पाठीचा खालचा भाग शक्य तितक्या उंच करा, ग्लूट्स, कोर आणि क्वाड्रिसेप स्नायूंना गुंतवून घ्या. किमान ३० सेकंद या स्थितीत रहा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)