Yoga Mantra: मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल तर ही योगासनं वाढवतील त्यांची एकाग्रता
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल तर ही योगासनं वाढवतील त्यांची एकाग्रता

Yoga Mantra: मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल तर ही योगासनं वाढवतील त्यांची एकाग्रता

Jun 27, 2024 10:03 AM IST

Yoga for Kids: अनेक वेळा मुलांना एखादा धडा पाठांतर केल्यानंतरही लक्षात राहीत नाही. तुम्हाला मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटत असेल तर मुलांची एकाग्रता आणि फोकस वाढवण्यासाठी त्यांना हे योगासनं करायला सांगा.

मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी योगासन
मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी योगासन (unsplash)

Yoga Poses To Improve Kids Focus and Concentration on Studies: योग आपल्याला शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील निरोगी ठेवण्यास मदत करतो. योग फक्त मोठ्या लोकांसाठीच नाही तर लहान मुलांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. मुलांनी लहानपणापासून योगासन केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या अभ्यासाची चिंता वाटत असेल, मुलांनी एखादा धडा बऱ्याच वेळा पाठांतर करूनही त्यांना लक्षात राहत नसेल तर मुलांची एकाग्रता आणि फोकस वाढवण्यासाठी त्यांच्या रुटीनमध्ये या योगासनांचा समावेश करा. योग मुलांना तणाव नियंत्रित करण्यास आणि त्यांची एकाग्रता, लक्ष केंद्रित करण्यास आणि स्मरणशक्ती वाढविण्यात मदत करू शकतो.

वृक्षासन

वृक्षासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर सरळ उभे राहून उजव्या पायाचा गुडघा वाकवून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना आपल्या डाव्या पायावर शरीराचे वजन संतुलित ठेवून सरळ उभे राहण्याचा प्रयत्न करा. यानंतर दीर्घ आणि खोल श्वास घेऊन आपले दोन्ही हात डोक्यावरून आणा आणि नमस्काराची मुद्रा करा. हे करताना पाठीचा कणा, कंबर आणि डोके सरळ रेषेत असावे. या आसनात थोडा वेळ राहा. यानंतर श्वास सोडा आणि पुन्हा आपल्या पूर्वीच्या स्थितीत या. ही प्रक्रिया ४-५ वेळा पुन्हा करा.

फायदा

या आसनात एका बिंदूवर लक्ष केंद्रित केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते. तर नियमित सराव केल्याने मानसिक स्थैर्य सुधारते.

बालासन

बालासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर बसून आपल्या शरीराचे सर्व वजन गुडघ्यांवर ठेवून दीर्घ श्वास घेताना पुढे वाका. हे करत असताना लक्षात ठेवा की आपल्या छातीने मांड्यांना स्पर्श केला पाहिजे. त्यानंतर कपाळाने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही काळ या स्थितीत राहिल्यानंतर पुन्हा नॉर्मल पोझिशनमध्ये या. ही प्रक्रिया ३-५ वेळा करू शकता.

फायदा

बालासन म्हणजेच चाइल्ड पोझचा सराव करणे आपल्या मेंदूसाठी फायदेशीर आहे. हे आपले मन शांत करते आणि एकाग्रता वाढविण्यास मदत करते.

ही आसनं देखील आहेत फायदेशीर

पद्मासन

हे आसन करताना मुलाला मांडी मारून बसायला सांगा. त्यानंतर त्याचे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करण्यास सांगा. या सोप्या आसनामुळे मुलाला एकाच ठिकाणी एकाग्र होण्यास मदत होईल.

सर्वांगासन

सर्वांगासन करण्यासाठी मुलाला आपल्या शरीराचा पूर्ण भार खांदे आणि डोक्यावर घ्यायचा असतो. त्यामुळे या आसनाचा हळूहळू सराव करावा. हे योगाआसन मेंदूतील रक्ताभिसरण सुरळीत ठेवते आणि मुलाची स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner