World Vitiligo Day: तुमच्या मनातही आहेत का त्वचेवरील पांढऱ्या कोडाविषयी हे प्रश्न? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Vitiligo Day: तुमच्या मनातही आहेत का त्वचेवरील पांढऱ्या कोडाविषयी हे प्रश्न? जाणून घ्या

World Vitiligo Day: तुमच्या मनातही आहेत का त्वचेवरील पांढऱ्या कोडाविषयी हे प्रश्न? जाणून घ्या

HT Marathi Desk HT Marathi
Published Jun 25, 2025 01:15 PM IST

त्वचेवर दिसणाऱ्या पांढरे डाग किंवा कोड याविषयी अनेकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. येथे जाणून घ्या याबाबत सविस्तर

World Vitiligo Day
World Vitiligo Day

पांढरे कोड हा एक त्वचेचा आजार आहे ज्यामध्ये रंगद्रव्य कमी झाल्यामुळे त्वचेवर पांढरे डाग पडतात. जेव्हा मेलेनिन (त्वचेच्या रंगासाठी जबाबदार रंगद्रव्य) तयार करणाऱ्या पेशी काम करणे थांबवतात किंवा मृत पावतात तेव्हा असे होते. जरी ते हानिकारक किंवा संसर्गजन्य नसले तरी, त्वचारोग हा अनेकदा चुकीच्या समजुतींनी वेढलेला दिसून येतो ज्यामुळे प्रभावित लोकांमध्ये गोंधळ आणि तणावाची समस्या निर्माण होते. हा लेख पांढरे कोड म्हणजेच विटीलिगो संबंधित गैरसमजूती दूर करण्यास मदत करतो. याबद्दल अधिक जाणून घेत तज्ञांच्या मदतीने सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. नवी मुंबई येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या प्लास्टिक, कॉस्मेटिक, रिकन्स्ट्रक्टिव्ह, हँड अँड ब्रॅचियल प्लेक्सस सर्जन डॉ. रिधिमा सचदेवा यांनी याबाबत सांगितले.

पांढरे कोड(विटीलिगो) हा रोगप्रतिकारक शक्तीसंबंधीत समस्यांमुळे होतो, जिथे शरीर चुकून त्याच्या रंगद्रव्य पेशींवर हल्ला करते. त्वचेचा रंग, वय किंवा लिंग काहीही असो, तो कोणालाही होऊ शकतो. हा आजार अनेकदा चेहरा, हात आणि पाय यासारख्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असलेल्या भागात दिसून येतो, परंतु तो शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम करू शकतो, ज्यामध्ये टाळू, तोंड आणि अगदी डोळे यांचा समावेश आहे. या स्थितीबद्दल जागरूकतेचा अभाव आहे; म्हणून, त्याशी संबंधित गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.

विटीलिगो बाबात असलेले गैरसमज आणि वास्तविकता

1. गैरसमज : पांढऱ्या कोडाची समय्या केवळ सावळ्या त्वचेच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो

वास्तविकता : पांढरे कोड कोणालाही प्रभावित करू शकतो. तो फक्त सावळ्या रंगाच्या त्वचेवर अधिक स्पष्टपणे दिसून येतो. म्हणून, कोणत्याही गैरसमजूतींवर विश्वास ठेवू नका व वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या.

2. गैरसमसमज : पांढरे कोड आणि ल्युकोडर्मा यांच्यात कोणताही फरक नाही

वास्तविकता : पांढरे कोड (विटिलिगो) ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे. ल्युकोडर्मा दुखापत, संसर्ग किंवा इतर रोगांमुळे होऊ शकतो. म्हणून, हे विधान खोटे आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, जे तुम्हाला पांढरे कोड आणि ल्युकोडर्मामधील फरक समजून घेण्यास मदत करतील.

3. गैरसमज : पांढरे कोड फक्त चेहरा आणि हातांवर दिसून येते

वास्तविकता : पांढरे कोड त्वचेवरील कुठल्याही भागात होऊ शकतो, ज्यामध्ये खाजगी भाग, काखेत आणि इतर त्वचेचा समावेश आहे.

4. गैरसमज : काही पदार्थ ही स्थिती आणखी बिघडवतात

वास्तविकता : आहार आणि त्वचारोगाच्या लक्षणांचा संबंध जोडणारा कोणताही ठोस पुरावा नाही. म्हणून, सोशल मीडियावर फॉरवर्ड केलेल्या कोणत्याही अफवा किंवा पोस्टवर विश्वास ठेवू नका.

5. गैरसमज : तेल आणि पूरक आहार या स्थितीचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात

वास्तविकता : या स्थितीवर कोणताही इलाज नाही, परंतु क्रीम, लाईट थेरपी आणि औषधे यासारख्या उपचारांमुळे ते नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते. स्वतःहून कोणतेही घरगुती उपचार करून पाहू नका. असे केल्याने अॅलर्जी आणि संसर्ग होऊ शकतो.

7. गैरसमज : तुम्हाला पांढरे कोड असलेल्या व्यक्तीच्या संपर्काने तुम्हालाही कोडाची समस्या उद्भवू शकते

वास्तविकता : पांढरे कोड एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. हा संसर्गजन्य आजार नाही आणि तो स्पर्शाने, वस्तू वापरल्याने किंवा जवळच्या संपर्कातून पसरू शकत नाही. हा आजार अनुवांशिक, रोगप्रतिकारक शक्ती आणि पर्यावरणीय कारणांमुळे विकसित होतो, कोणत्याही संसर्गामुळे हा संसर्ग पसरत नाही. म्हणून, घाबरून जाऊ नका कारण तो संसर्गजन्य नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner