Benefits of Eating Vegetarian: जगभरातील वनस्पती-आधारित आहाराचे महत्त्व, पौष्टिक मूल्य आणि उपलब्धतेकडे लक्ष वेधण्यासाठी 'जागतिक शाकाहारी दिन' हा एक महत्त्वाचा दिवस आहे. शाकाहारी आहारात भाज्यांना महत्त्वाचे स्थान आहे. कमी कॅलरी आणि उच्च पोषण यामुळे भाज्या आहारतज्ञांच्या नेहमीच आवडत्या असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रदेशात तेथील रहिवाशांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी काही भाज्या असतात. यातील काही भाज्या इतक्या खास आहेत की, तुम्ही त्यांना मांसापेक्षा चांगले मानू शकता. आज १ ऑक्टोबर 'जागतिक शाकाहार दिना'निमित्त अशाच काही भाज्यांबद्दल जाणून घेऊया.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये पालक सर्वात आधी येतो. यामध्ये थायमिन आढळते, जे तुमच्या शरीराला कर्बोदकांमधे ऊर्जेत बदलण्यास मदत करते. आपले शरीर नैसर्गिकरित्या थायमिन तयार करू शकत नाही. त्यामुळे आहारात पालकचा समावेश करणे गरजेचे आहे.पालकमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे जुनाट आजार होण्याचा धोका कमी होतो. पालकसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये बीटा-कॅरोटीन आणि ल्युटीन असते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. शिवाय या दोन प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्समुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त, २०१५ च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की पालक सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण ते रक्तदाब कमी करू शकते.
गाजराचा हलवा असो किंवा ज्यूस, सगळेच खूप पौष्टिक असतात. गाजरात अगदी कमी फॅट्स असतात. तर त्यात सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, प्रथिने, व्हिटॅमिन ए, डी, सी, बी६ इत्यादी मुबलक प्रमाणात असतात. गाजरात बीटा कॅरोटीन असते. हे अँटिऑक्सिडंट कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की दर आठवड्याला गाजर खाल्ल्याने प्रोस्टेट कर्करोगाचा धोका ५ टक्क्यांनी कमी होतो.
लसणातील सर्वात सक्रिय कंपाऊंड ॲलिसिन आहे. जे आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यात अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात. लसणात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळते. यासोबतच यामध्ये सेलेनियम, मँगनीज, कॅल्शियम सारखे घटक देखील आढळतात. जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात. लसूण पोट आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करते. लसणामुळे सर्दी, खोकला, कफ इत्यादी समस्यांपासून लवकर आराम मिळतो.
वाटाणा ही स्टार्चयुक्त भाजी समजली जाते. याचा अर्थ त्यामध्ये जास्त कार्ब आणि कॅलरीज असतात. जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. तरीही हिरवे वाटाणे पौष्टिक असतात.फायबरयुक्त असल्याने, वाटणे तुमच्या आतड्यात फायदेशीर बॅक्टेरिया वाढवून आणि नियमित आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन देऊन पाचन आरोग्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, वाटण्यामध्ये सॅपोनिन भरपूर प्रमाणात असते, जे कर्करोगाशी लढण्यासाठी प्रभावी आहे.
रताळे चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. त्यात प्रथिने, व्हिटॅमिन बी ६, मँगनीज, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन फुफ्फुस आणि स्तनाच्या कर्करोगासह विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका प्रभावीपणे कमी करते. त्याचा पांढरा प्रकार म्हणजे पांढरी रताळे मधुमेह रोखण्यासाठी प्रभावी आहेत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)