Helpline number if you are thinking about suicide: आत्महत्येच्या वाढत्या घटना हा जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. दरवर्षी जगभरात लाखो लोक आत्महत्येमुळे आपला जीव गमावतात. भारतातही ही समस्या मोठी चिंतेची बाब बनत आहे. एका नवीन अहवालानुसार, भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे वार्षिक प्रमाण झपाट्याने वाढले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) २०२४ च्या माहितीवर आधारित, आत्महत्यांच्या एकूण संख्येत वार्षिक २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर विद्यार्थी आत्महत्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण ४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.
मानसिक आरोग्य तज्ञ म्हणतात की, आत्महत्येचे विचार गंभीर मानसिक आरोग्य समस्यांचे सूचक आहेत. यावरून हे देखील दिसून येते की ती व्यक्ती बऱ्याच काळापासून तणाव आणि नैराश्यामध्ये जगत आहे. ज्याचे वेळीच निदान आणि उपचार केले गेले असते तर परिस्थिती या पातळीपर्यंत बिघडण्यापासून रोखता आली असती. जगभरातील आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. आणि वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी योजना तयार करणे या उद्देशाने 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन' दरवर्षी १० सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांशिवाय कौटुंबिक वाद आणि आर्थिक विवंचना हे देखील आत्महत्येचे कारण आहे. आत्महत्या रोखण्यासाठी, आपल्या सभोवतालच्या लोकांच्या वर्तनाकडे गांभीर्याने लक्ष द्या. यामध्ये काही नकारात्मक बदल दिसल्यास सावध राहा. त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. कधीकधी या लोकांसाठी फक्त तिथे कुणीतरी असणे हेच फार महत्वाचे असते. एखाद्या व्यक्तीला त्यांची काळजी आहे आणि आपण त्याच्यासोबत आहे हे जाणून तो व्यक्ती आपल्या मनाला बळकट करतो. आणि त्याच्या मनातील आत्महत्येच्या विचारांची तीव्रता कमी होऊ लागते. अशा लोकांना शक्य तितक्या लवकर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेण्यास प्रोत्साहित करा. तुमचा हा छोटासा प्रयत्न एखाद्याचा जीव वाचवू शकतो.
आत्महत्येचा धोका असलेल्या लोकांसाठी मदत देणे महत्त्वाचे आहे. यात क्रायसिस इंटरव्हेंशन सर्व्हिसेस, सुसाइड प्रिव्हेंशन हेल्पलाइन आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी बोलणे गरजेचे असते. शिवाय तुम्ही आत्महत्येचा विचार सतत मनात येत असेल तर https://www.aasra.info/helpline.html#Maharashtra या हेल्पलाईनवर जाऊन मदत मिळवू शकता.
'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन' २०२४ ची थीम "आत्महत्येची कहाणी बदलणे" हा एक महत्त्वाचा संदेश आहे जो आत्महत्येमुळे प्रभावित झालेल्यांना आशा आणि आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाला गरज असेल तर तुम्ही या नंबरवर iCall वर या क्रमांकावर 9152987821 वर कॉल करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)