Effects of smile on the Body: खळखळून हसणारे लोक नेहमीच चांगले दिसतात. तुमच्या ओठांवर एक तेजस्वी हास्य तुमचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवते. जेव्हा तुम्ही हसत हसत भेटता तेव्हा ती भेट संस्मरणीय होते. पण तुम्हाला माहित आहे का की, हसणे केवळ नातेसंबंधांसाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हसण्याने तुमच्या आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जे बहुतांश लोकांना माहितीच नाहीत. आज आम्ही तुम्हाला हसण्याचे काही चमत्कारिक फायदे सांगणार आहोत.
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हसल्याने एंडोर्फिन, नैसर्गिक वेदनाशामक आणि सेरोटोनिन सोडतात. हे तिन्ही न्यूरोट्रांसमीटर आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत निरोगी ठेवतात. ही नैसर्गिक रसायने केवळ तुमचा मूड सुधारत नाहीत तर ते तुमच्या शरीराला आराम देतात आणि शारीरिक वेदना कमी करतात. शिवाय कॅन्सास विद्यापीठातील संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, हसण्यामुळे मानसिक तणावाच्या परिस्थितीत शरीराचा ताण आणि हृदयाची गती कमी होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी हास्य अत्यंत महत्वाचे आहे.
जेव्हा कोणी तुमच्याकडे पाहून हसते तेव्हा तुम्हीही त्याच्याकडे बघून हसायला लागता. हसणे तुमचा वाईट मूड सुधारण्यास मदत करते. आणि २०१० च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असेल तेव्हा हसणे तुमचा मूड सुधारते आणि सकारात्मक विचार वाढवते. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते.
पन्नाशीनंतर बहुतांश लोकांना रक्तदाबाचा त्रास असतो. त्यामुळेच अनेकजण औषधे घेत असतात. पण त्यासोबतच हास्यही तुम्हाला फायदा देऊ शकते. खळखळून हसण्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. जी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे. त्यामुळे सतत हसत राहा.
मेयो क्लिनिकने दिलेल्या अहवालानुसार, हसण्यामुळे तुमचे शरीर स्वतःचे नैसर्गिक वेदनाशामक सोडते. आणि २०१२ च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, सामाजिक हास्यामुळे तुमची वेदना सहनशीलता थ्रेशोल्ड वाढते, ज्यामुळे वेदना सहन करण्याची क्षमता वाढते.
अनेकांना माहिती नसेल पण हसणे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. मेयो क्लिनिकने अहवाल दिला आहे की, हास्य आणि सकारात्मक विचार तुमच्या मेंदूतील सिग्नलिंग रेणू सोडतात जे तणाव आणि रोगाशी लढतात, तर नकारात्मक विचार तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी करतात.
तुमचे हास्य तुमच्या शरीराला तणावासारख्या परिस्थितीला सामोरे जाण्यास मदत करते. २०१५ मध्ये सायकोलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, तणावपूर्ण कामांमध्ये हसल्याने हृदयाची गती कमी होते. तणावामुळे सहसा हृदय गती आणि रक्तदाब वाढतो. म्हणून, जेव्हा तणाव येतो तेव्हा हसण्यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही फायदे मिळू शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या