मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Sickle Cell Day 2024: सिकलसेल डिसऑर्डर म्हणजे काय? ही आहेत लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

World Sickle Cell Day 2024: सिकलसेल डिसऑर्डर म्हणजे काय? ही आहेत लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Jun 19, 2024 11:08 AM IST

Sickle Cell Anemia Disease: जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी ३ लाखांहून अधिक मुले थॅलेसेमिया आणि सिकलसेल रोगासह गंभीर स्वरूपाच्या हिमोग्लोबिन रोगासह जन्माला येतात. याचे लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या.

सिकलसेल डिसऑर्डरचे लक्षणं आणि उपाय
सिकलसेल डिसऑर्डरचे लक्षणं आणि उपाय (freepik)

Symptoms and Treatment of Sickle Cell: दरवर्षी १९ जून रोजी जगभरात जागतिक सिकलसेल दिवस साजरा केला जातो. जागतिक सिकलसेल दिवस साजरा करण्यामागचा उद्देश या अनुवांशिक रक्तविकाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढविणे हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार, थॅलेसेमिया आणि सिकलसेल रोगासह गंभीर प्रकारच्या हिमोग्लोबिन रोगासह दरवर्षी ३ लाखांहून अधिक मुले जन्माला येतात.

सिकलसेल डिसऑर्डर म्हणजे काय?

सिकल सेल हा एक अनुवांशिक ब्लड डिसऑर्डर आहे जो लाल रक्त पेशींवर परिणाम करतो. निरोगी लाल रक्तपेशी गोल आणि लवचिक असतात, ज्या शरीराच्या सर्व भागात ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करतात. तर सिकलसेल आजाराच्या वेळी या लाल रक्तपेशी अर्ध चंद्राकार व कडक होतात. सिकलसेल डिसऑर्डर ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचत नाही. ज्यामुळे व्यक्तीला वेदना, थकवा, इन्फेक्शनसह आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

सिकलसेलची लक्षणं

- सिकलसेल रोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे हाडे, स्नायू, पोट किंवा पाठीमध्ये अचानक तीव्र वेदना जाणवणे.

- लोकांना बऱ्याचदा थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

- सिकल सेल रोग लाल रक्तपेशी नष्ट करतो, ज्यामुळे अॅनिमिया होतो. याचा त्रास झालेल्या व्यक्तीला त्वचा पिवळसर पडणे, श्वास लागणे आणि चक्कर येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

- सिकलसेल आजार असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

- हात-पायाला सूज येणे

- प्यूबर्टी किंवा प्रौढत्वास उशीर

सिकलसेल डिसऑर्डरवर उपाय

सिकलसेल आजार अनुवांशिक आजार असल्याने पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. हा आजार असलेल्या बाळाला जन्मानंतर लगेचच लस दिली जाते. कुटुंबात सिकलसेल आजाराचा इतिहास असल्यास जेनेटिक टेस्ट करून घेऊ शकता. याशिवाय या आजाराच्या उपचारासाठी अँटीबायोटिक्स, इंट्राव्हेनस फ्लुइड, नियमित रक्त संक्रमण आणि कधी कधी शस्त्रक्रिया देखील करावी लागते. या आजाराची योग्य काळजी घेतली तर सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळवता येते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel