Which animals cause rabies: दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जगभरात 'रेबीज दिवस' साजरा केला जातो. रेबीज या जीवघेण्या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. रेबीज हा एक प्राणघातक विषाणू आहे ज्यामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये मृत्यू होतो. रेबीज हा सामान्यतः कुत्र्यांशी संबंधित असतो. कारण तो सहसा कुत्र्याच्या चाव्याव्दारे पसरतो. पण, तुम्हाला माहीत आहे का रेबीजचा फैलाव फक्त कुत्र्याने चावल्याने होत नाही, तर इतर काही कारणांमुळेदेखील रेबीज पसरतो. आजच्या या या जागतिक रेबीज दिनानिमित्त आम्ही तुम्हाला रेबीज पसरण्याची कारणे, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल सांगणार आहोत...
रेबीजची कारणे, प्रतिबंध आणि लक्षणे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला रेबीज म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. रेबीज हा एक प्राणघातक विषाणू आहे, जो संक्रमित कुत्र्यांच्या किंवा प्राण्यांच्या लाळेमध्ये असतो आणि या प्राण्यांच्या चाव्याव्दारे पसरतो. रेबीजची लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये दिसू लागली की, बहुतेक प्रकरणांमध्ये यामुळे मृत्यू होऊ शकतो. त्यामुळेच रेबीज हा एक प्राणघातक विषाणू आहे.
रेबीज हा संसर्ग झालेल्या प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा ओरखड्याने पसरतो. याशिवाय, जेव्हा संक्रमित प्राण्याची लाळ एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या थेट संपर्कात येते तेव्हा मानवांना देखील रेबीज होऊ शकतो. कुत्रा चावण्याव्यतिरिक्त, रेबीज मांजर, बीव्हर, गाय, शेळ्या, वटवाघुळ, रॅकून, कोल्हे, माकडे आणि कोयोट्समध्ये देखील आढळतो. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये, रेबीज हा संसर्ग झालेल्या कुत्र्यांच्या चाव्याव्दारे किंवा ओरखड्यांमुळे होतो. रेबीज रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या पाळीव प्राण्याचे लसीकरण करणे आणि भटक्या कुत्र्यांपासून अंतर राखणे होय.
रेबीजची लक्षणे सहसा लवकर दिसून येत नाहीत. एखाद्या व्यक्तीला संक्रमित प्राण्याने चावा घेतल्यावर किंवा रेबीजच्या संपर्कात आल्यावर लक्षणे निर्माण होण्यापूर्वी हा विषाणू शरीरातून मेंदूपर्यंत जातो, त्यानंतरच लक्षणे दिसतात. रेबीज व्यक्तीच्या शरीरात १ ते ३ महिने गुप्त राहू शकतो.रेबीजच्या लक्षणांबद्दल सांगायचे तर, त्याचे पहिले लक्षण ताप आहे.
-भीती वाटणे
-पाणी गिळण्यात अडचण किंवा द्रवपदार्थ खाण्याची भीती
-ताप येणे
-तीव्र डोकेदुखी
-भयानक स्वप्ने आणि जास्त लाळ येणे
-निद्रानाश
-अर्धवट अर्धांगवायू हे देखील रेबीजचे लक्षण असू शकते.
एखाद्या व्यक्तीला कुत्रा, भटका प्राणी किंवा संक्रमित प्राण्याने चावा घेतल्यास त्याने त्वरित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर्स जखमेची तपासणी करेल आणि नंतर उपचार आवश्यक आहे की नाही हे ठरवेल. हे टाळण्यासाठी रेबीजची चाचणी करून घ्या आणि चावलेल्या प्राण्याचीही चाचणी करा. याशिवाय रेबीजची लागण झालेल्या प्राण्याने चावल्यास, ओरबाडल्यास किंवा त्याची लाळ त्वचेच्या थेट संपर्कात आल्यास त्वरित रेबीजची लस घ्यावी. वन्य प्राण्यांपासून दूर राहा, तुमच्या घराजवळ वटवाघळांना येऊ देऊ नका आणि तुमच्या पाळीव प्राण्याला रेबीजची लस द्या. पाळीव प्राणी कोणत्याही रेबीज संक्रमित प्राण्याच्या संपर्कात येत नाहीत याची खात्री करण्यासाठी, तुमचे पाळीव प्राणी घरात ठेवा आणि ते फक्त तुमच्या देखरेखीखाली बाहेर सोडा. अशाप्रकारे रेबीज प्रतिबंधक उपाय तुम्हाला करता येतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)