Importance of Physiotherapy for Osteoporosis: ऑस्टिओपोरोसिस या आजारामध्ये हाडे कमजोर झालेली असतात आणि त्यामुळे त्यांचे फ्रॅक्चर कधीही, अगदी थोडाशा हालचालीने देखील होऊ शकते. सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांमध्ये ही एक सामान्य स्थिती आहे. वयस्कर महिलांना या दुर्बल स्थितीचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. या स्थितीमुळे ऑस्टियोपोरोटिक फ्रॅक्चर गंभीर असू शकते आणि जीवनाच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होऊ शकतो.
या स्थितीमागील जोखीम घटक म्हणजे वय, आणि रजोनिवृत्ती. कौटुंबिक इतिहास, अनुवांशिकता, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता हे इतर घटक या स्थितीस कारणीभूत ठरतात. संधिवाताचे व्यवस्थापन करण्यासाठी तज्ञांकडून औषधे, आहारातील बदल आणि फिजिओथेरपी सुचविले जाते. मुंबई येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या फिजिओथेरपिस्ट डॉ. धारा पारेख यांनी ऑस्टियोपोरोसिसच्या व्यवस्थापनात फिजिओथेरपी कसे महत्त्वाचे आहे याबाबत काही टिप्स दिल्या आहेत.
१. ऑस्टिओपोरोसिसच्या व्यवस्थापनात फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हाडांची बळकटी वाढवण्यावर आणि शारीरीक संतुलन सुधारण्यास मदत करतात. फ्रॅक्चरच्या भीतीमुळे हालचालींपासून दूर राहण्याऐवजी, रुग्ण एकूण गतिशीलता वाढवू शकतात. फिजिओथेरपिस्ट वैयक्तिक प्रोग्राम आखण्यापूर्वी प्रत्येक रुग्णाच्या शारीरीक स्थितीचे मूल्यांकन करतात.
२. हाडांची झीज कमी होण्यापासून आणि हाडांच्या वाढीस आणि विकासाला चालना देण्यासाठी ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांना फिजिओथेरपीची शिफारस केली जाते. हे मणक्याचे फ्रॅक्चर टाळण्यासाठी, शारीरीक संतुलन आणि हालचाल वाढविण्यासाठी, पडण्याचा धोका कमी करण्यासाठी, स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि वेदना व्यवस्थापित करण्यासाठी तसेच शरीराची योग्य स्थिती राखण्यास मदत करेल. त्यामुळे दैनंदिन कामे सहजतेने करता येतील. पडणे, फ्रॅक्चर होणे आणि किरकोळ दुखापतींचा धोका कमी करण्यासाठी घरामधील गालिचे, जिना, शौचालय याचे योग्य नियोजन करावे.
३. फिजिओथेरपिस्ट तुमच्या विशिष्ट गरजा समजून घेईल आणि तुमच्या शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवून, तुम्ही अति व्यायाम किंवा कमी व्यायाम तर करत नाही याची खात्री करून त्यानुसार तुमच्यावर उपचार करतील. हाडांवर ताण येईल आणि फ्रॅक्चर होईल असे उच्च-प्रभावशील शारीरीक क्रिया टाळा.
४. ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांना ज्या व्यायामाची शिफारस केली जाते ते म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग, हळूहळू पायऱ्या चढणे, नृत्य करणे आणि चालणे. शारीरीक स्थिरता व संतुलन राखणाऱ्या व्यायामावरही देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे गरजेचे आहे. दुखापती टाळण्यासाठी व्यायाम करताना योग्य शारीरीक स्थिती राखा.
फिजिओथेरपीमध्ये या अनुकूल पध्दतींचा अवलंब करून, ऑस्टिओपोरोसिस असलेल्या व्यक्ती त्यांची हाडे मजबूत राखु शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)