Organ Donation Day 2024: कोण करू शकतं अवयव दान? 'जागतिक अवयवदान दिन' निमित्त जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Organ Donation Day 2024: कोण करू शकतं अवयव दान? 'जागतिक अवयवदान दिन' निमित्त जाणून घ्या

Organ Donation Day 2024: कोण करू शकतं अवयव दान? 'जागतिक अवयवदान दिन' निमित्त जाणून घ्या

Published Aug 13, 2024 12:21 PM IST

World Organ Donation Day 2024: जागतिक अवयवदान दिन दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे हा आहे.

जागतिक अवयवदान दिन
जागतिक अवयवदान दिन (freepik)

Who Can Donate Organs: जगभरात दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. अवयवदान दिन साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यासाठी प्रतिज्ञा करण्यास प्रोत्साहित करणे हा देखील आहे. नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार भारतात दरवर्षी ५ लाख लोक वेळेवर अवयव न मिळाल्याने दगावतात. तर असे म्हटले जाते की, एक व्यक्ती अवयव दान करून ८ लोकांना नवीन जीवन देऊ शकते.

जागतिक अवयवदान दिनाचा इतिहास

जगातील पहिले अवयवदान १९५४ साली करण्यात आले. रोनाल्ड ली हेरिक नावाच्या व्यक्तीने १९५४ साली आपली एक किडनी आपल्या जुळ्या भावाला दान केली होती. पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण डॉ. जोसेफ मरे यांनी केले. त्यासाठी डॉ. जोसेफ मरे यांना १९९० मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले.

कोण करू शकतं अवयव दान

जर तुमचं वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही स्वत:हून अवयव दानासाठी नोंदणी करू शकता. परंतु जर एखाद्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याला अवयवदान करण्यासाठी वडिल किंवा पालकांची संमती आवश्यक असते. मृत्यूनंतर अवयवदानासाठी नोंदणी केल्यास त्या व्यक्तीची प्रथम तपासणी केली जाईल. जेणेकरून प्रत्यारोपण पथकाला त्या व्यक्तीचे कोणते अवयव दान करता येतील याचा शोध घेता येते.

कोण अवयवदान करू शकत नाही

प्रत्येक व्यक्ती अवयव दान करू शकत नाही. एखादी व्यक्ती काही विशिष्ट परिस्थितीने ग्रस्त असल्यास आपले अवयव दान करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर दाता कर्करोग, एचआयव्ही, फुफ्फुस किंवा हृदयरोगासारख्या जुनाट आजाराने ग्रस्त असेल तर तो अवयवदान करू शकत नाही. मूत्रपिंड प्रत्यारोपणाबद्दल बोलायचे झाले तर मधुमेह, अनियंत्रित बीपी, कॅन्सर आदी आजारांनी ग्रस्त असलेले लोक मूत्रपिंड दान करू शकत नाहीत.

कोणते अवयव करू शकतो दान

सामान्यत: हे अवयव प्रत्यारोपित केले जाऊ शकतात - मूत्रपिंड, हृदय, यकृत, स्वादुपिंड, आतडे, फुफ्फुसे, हाडे, अस्थिमज्जा, त्वचा आणि कॉर्निया. आकडेवारीनुसार, ज्या अवयव दात्याचे अवयव चांगले काम करत आहेत, तो आपल्या हयातीत अवयवदान करून ८ पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवू शकतो.

अवयवदान करण्यापूर्वी माहीत असाव्या या गोष्टी

- कोणतेही अवयवदान करण्यापूर्वी जिवंत दात्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असावे याची काळजी घ्या.

- अवयवदान करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान १८ वर्षे असावे. जर वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याच्या पालकांची संमती देखील आवश्यक आहे.

- दात्याला अवयवदान करण्याची इच्छा असली पाहिजे. हे काम सक्ती म्हणून करू नका.

- दात्याला जोखीम, फायदे, संभाव्य परिणामांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner