मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Oral Health Day: खराब ओरल हेल्थमुळे वाढतो या आजारांचा धोका, वेळीच घ्या काळजी

World Oral Health Day: खराब ओरल हेल्थमुळे वाढतो या आजारांचा धोका, वेळीच घ्या काळजी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 20, 2024 12:50 PM IST

World Oral Health Day 2024: जर तुम्ही हिरड्या आणि दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही तर हिरड्यांशी संबंधित आजार तर उद्भवतातच शिवाय हिरड्या आणि तोंडाचे आरोग्य खराब झाल्याने इतर आजारांचा धोकाही वाढतो. यासाठी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

खराब ओरल हेल्थमुळे वाढतो आजारांचा धोका
खराब ओरल हेल्थमुळे वाढतो आजारांचा धोका (freepik)

Bad Oral Health Increase Risk of Disease: दरवर्षी २० मार्च रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिन (world oral health day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे ओरल हेल्थ आणि मौखिक स्वच्छतेबद्दल लोकांना जागरूक करणे हे आहे. आजही अनेक लोक दात आणि हिरड्या स्वच्छ करण्याबाबत निष्काळजी असतात. त्याचा परिणाम अनेक आजारांच्या रूपात दिसून येतो. खराब ओरल हेल्थमुळे दात कमकुवत होतात आणि हिरड्या खराब होतातच पण सोबतच शरीरात इतर रोग देखील होतात. अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे. जाणून घ्या कोणते आजार आहेत जे तुमच्या ओरल हेल्थवर अवलंबून असतात.

कॉर्डियोवस्कुलर आरोग्याची जोखीम

अभ्यासात खराब ओरल हेल्थ आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य यांच्यातील संबंध उघड केले आहेत. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या मते, हिरड्या आणि तोंडात असलेले बॅक्टेरिया रक्तापर्यंत पोहोचतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये सूज वाढवतात. त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे दात आणि हिरड्या स्वच्छ करून हृदयविकार टाळता येतात.

इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या

पुरुषांमध्ये हिरड्या आणि दातांची स्वच्छता न ठेवण्याच्या सवयीमुळे इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या उद्भवू शकते. जेव्हा तोंडात असलेले बॅक्टेरिया रक्तात पोहोचतात तेव्हा ते केवळ हृदयच नाही तर इतर आजारांना कारणीभूत ठरतात. २०१९ मध्ये केलेल्या अभ्यासात क्रॉनिक पीरियडॉन्टायटिस आणि इरेक्टाइल डिसफंक्शन यांच्यातील संबंध दिसून आला. क्रॉनिक पीरियडॉन्टल रोग हा दातांमधील बॅक्टेरियामुळे होतो. ज्यामध्ये हिरड्या दातांपासून दूर जातात आणि एक अंतर दिसून येते. या अंतरात अडकलेल्या अन्नामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि हे जीवाणू रक्तात पोहोचतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते. वाहिन्यांमध्ये सूज आल्याने इरेक्शनचा त्रास होतो.

कर्करोगाचा धोका

तंबाखू आणि धूम्रपानामुळे दातांमध्ये असलेली घाण आणि बॅक्टेरिया कर्करोगाचा धोका वाढवतात. जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पीरियडॉन्टायटीस असलेल्या रुग्णांमध्ये कर्करोगाचा धोका २४ टक्के जास्त होता. विशेषत: पॅनक्रियाज कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये.

मधुमेह

हिरड्याच्या आजाराची समस्या ही केवळ मधुमेहाची समस्या निर्माण करत नाही तर ज्यांना मधुमेह आहे त्यांना हिरड्यांचा आजार होण्याचा धोका जास्त असतो. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, हिरड्याच्या आजारामुळे सूज होते. जे रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे होते. याशिवाय आणखी आजार देखील होऊ शकतात.

- खराब ओरल हेल्थमुळे फुफ्फुसाच्या संसर्गाची समस्या उद्भवू शकते.

- २०२१ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, हिरड्यांना सूज आल्याने किडनीचे कार्य १० टक्के कमी होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)