World Oceans Day साजरा करण्याचा उद्देश काय आहे? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Oceans Day साजरा करण्याचा उद्देश काय आहे? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

World Oceans Day साजरा करण्याचा उद्देश काय आहे? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Published Jun 07, 2024 11:25 PM IST

World Oceans Day 2024 Theme: जागतिक महासागर दिन का साजरा केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? येथे जाणून घ्या या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम

जागतिक महासागर दिन
जागतिक महासागर दिन (Unsplash)

World Oceans Day History and Significance: महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जवळजवळ ७० टक्के भाग व्यापतात. ते जगातील सुमारे ५० टक्के ऑक्सिजन तयार करतात आणि बहुतेक प्रजातींचे घर देखील आहेत. जैवविविधतेचा निरोगी समतोल राखण्यासाठी आणि मानवता टिकवण्यासाठी ते जबाबदार आहेत. मात्र, कालांतराने प्रामुख्याने मानवी हालचालींमुळे महासागरांचे प्रदूषण आणि ऱ्हास होत आहे. जगातील महासागरांवर होणाऱ्या हालचाली आणि त्याचा काय परिणाम होत आहे, याची जाणीव असणे गरजेचे आहे. जगातील महासागरांचे आरोग्य पूर्वपदावर आणण्यासाठी उपाय योजना करण्याचे आवाहन करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ८ जून रोजी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो. या खास दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि थीम जाणून घ्या.

जागतिक महासागर दिनाचा इतिहास

१९९२ मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत जागतिक महासागर दिनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ५ डिसेंबर २००८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. मानवाचा समुद्राशी असलेला संबंध याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने या दिवसाची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासागर व्यवहार आणि समुद्र कायदा विभागातर्फे दरवर्षी जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जागतिक महासागर दिन २०२४ ची थीम

यावर्षीच्या जागतिक महासागर दिनाची थीम आहे - नवीन खोली जागृत करा (Awaken New Depths). या वर्षीची कृती थीम आहे - आपल्या महासागर आणि हवामानासाठी कृतीस उत्तेजन देणे (Catalysing action for our ocean and climate).

जागतिक महासागर दिनाचे महत्त्व

पृथ्वीवरील आजवरच्या सर्वात मोठ्या संकटांपैकी एक म्हणजे हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग. या संकटावर काम करत असताना आपल्याला महासागरांचे महत्त्व समजून घेणे आणि निसर्गात निरोगी समतोल राखणे आवश्यक आहे. महासागर जागतिक तापमानाचे नियमन करतात आणि अन्न आणि औषधांचा समृद्ध स्त्रोत देखील आहेत. महासागरांचे आरोग्य पूर्वपदावर आणण्यासाठी एकत्र काम करण्याची हीच योग्य वेळ आहे. शाश्वत पद्धतींद्वारे, आपण ते शक्य करू शकतो आणि एक चांगले जग तयार करण्यासाठी एकत्र काम करू शकतो.

Whats_app_banner