Tobacco Use in E-Cigarettes and Flavored Hookah: जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. तंबाखुच्या सेवनाने तोंड, फुफ्फुसे, गळा, स्वरयंत्र, अन्ननलिका, पोट, मूत्राशय, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे माहीत असूनही अनेक तरुण आज तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात १० कोटीपेक्षा अधिक नागरिक विविध माध्यमातून तंबाखुचे सेवन करतात. यामध्ये २५ टक्के पुरुष तर, १३ ते १५ टक्के महिलांचा समावेश आहे. यापैकी १० लाख रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने प्राण गमवावे लागतात. मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलच्या कर्करोग तज्ज्ञ डॉ. भावना पारेख यांनी तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी कसे घातक ठरते याबाबत सांगितले आहे.
तंबाखूमधील अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, अॅन्टबीन, अॅनाबेसीन अशी रसायने असून भारतीय तंबाखूमध्ये मक्र्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात. या व्यतिरिक्त तंबाखूच्या धुरात व धुम्रपानात डीडीटी, बुटेन, सायनाईड, अमोनिया आदी रसायने आढळतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो.
ई सिगारेट ही सामान्य सिगारेटपेक्षा कमी हानिकारक आणि सुरक्षित मानतात. त्यामुळेच तरुणांमध्येही त्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. वास्तविकता ई-सिगारेट हे इलेक्ट्रॉनिक निकोटीन वितरण प्रणालीचे एक प्रकारचे उपकरण आहे, जे बॅटरीवर चालते आणि शरीरात निकोटीन पोहोचवते, जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सिगारेटपासून दूर राहावे. अन्यथा दीर्घकाळात अनेक दुष्परिणाम दिसू शकतात.
हुक्का आपल्या आधुनिक रुपात शहरातील बार आणि पबमध्ये पोहोचला असून तो तरुण मुले-मुलींची पसंतीही बनला आहे. आजकाल शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी मुले आणि तरुण सिगारेट ओढणे आणि हुक्का ओढणे हे फॅशन म्हणून पाहत आहेत. मात्र तरुणाईमध्ये सिगारेट आणि हुक्का ओढल्याने फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वयाच्या ५० व्या वर्षी ५ पटीने वाढतो. यामुळे दरवर्षी भारतात लाखो लोकांचा मृत्यू होत आहे.
सध्या युवकांमध्ये फ्लेवर्ड हुक्का पिण्याचा ट्रेंड आहे. अनेक युवकांना या हुक्क्याची टेस्ट फार आवडते आणि त्यांना याची सवय होऊन जाते. त्यामुळे फ्लेवर्ड हुक्क्याचे सतत सेवन करणाऱ्या व्यक्तीला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. कारण या हुक्क्यातही काही प्रमाणात तंबाखू असते. त्यामुळे तो आरोग्यासाठी हानिकारकच आहे. फ्लेवर्ड हुक्क्यात असे पदार्थ असतात ज्यांमध्ये तंबाखूचा समावेश असतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)