Foods To Reduce Cravings When Quitting Smoking: जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जातो. तंबाखू सेवनाचे धोके, तंबाखू कंपन्यांच्या व्यावसायिक पद्धती, तंबाखूच्या वापराचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या उपाय योजना आणि भावी पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी जगभरातील व्यक्ती आरोग्य आणि निरोगी जगण्याचा हक्क कसा सांगू शकतात याबद्दल हा दिवस लोकांना शिक्षित करतो. धूम्रपान सोडताना येणारी निकोटीनची तीव्र इच्छा कमी करण्यासाठी आणि धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी काही पदार्थ उपयुक्त असतात. या पदार्थांमुळे सिगारेटची चव वाईट वाटते किंवा धूम्रपान करताना कराव्या लागणाऱ्या हाताच्या हालचालींना पर्यायी पर्याय उपलब्ध होतो. त्याचबरोबर, काही पदार्थ तंबाखू आणि निकोटीन सोडण्याच्या लक्षणांवर मात करण्यास मदत करतात, ज्यामुळे धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न यशस्वी होण्यास मदत होते.
"धूम्रपान सोडणे आव्हानात्मक असू शकते, विशेषत: जेव्हा क्रेविंग होते. तथापि, आपल्या आहारात विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्याने त्या क्रेविंग व्यवस्थापित करण्यास आणि निकोटीनच्या व्यसनापासून बाहेर येण्यास मदत होते. पण जेवणाविषयी बोलण्याआधी एक योगाची टिप जाणून घ्या. जेवायला बसण्यापूर्वी दोन मिनिटे थांबा, विशेषत: जेव्हा आपल्याला भूक लागते. यामुळे घाई कमी होते आणि चैतन्य वाढते. व्यसन हे असंतुलनामुळे येतं: जास्त घाई आणि कमी जाणीव. भूक लागणं यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याआधी दोन मिनिटं थांबल्याने तुम्ही जाणीवपूर्वक जीवन जगण्यास शिकता आणि त्यामुळे व्यसनापासून मुक्त होण्यास मदत होते, असं क्लासिकल हठयोग शिक्षिका आणि लाईफस्टाइल तज्ज्ञ श्लोका सांगतात. श्लोकाने एचटी लाइफस्टाइलसोबत ५ पदार्थ शेअर केले, जे आपल्याला धूम्रपानाच्या व्यसनाशी लढण्यास मदत करू शकतात
१. डार्क चॉकलेट (७०% कोको): डार्क चॉकलेट खाल्ल्याने साखर आणि निकोटीन या दोन्हीची क्रेविंग कमी होण्यास मदत होते. डार्क चॉकलेटमधील फ्लेव्होनॉइड्स डोपामाइनच्या पातळीवर परिणाम करतात, रिलॅक्सेशनची भावना प्रदान करतात आणि धूम्रपान करण्याची इच्छा कमी करतात.
२. संपूर्ण धान्य: निकोटीन काढून घेतल्याने बऱ्याचदा साखरयुक्त आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांची क्रेविंग होते. गहू, रेड राईस, बार्ली, ओट्स आणि क्विनोआ सारखे संपूर्ण धान्य रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास, कार्बोहायड्रेटची लालसा कमी करण्यास आणि परिपूर्णतेची भावना वाढविण्यास मदत करू शकते.
३. हर्बल टी: काही हर्बल टी सुखदायक असू शकतात आणि धूम्रपान सोडण्याशी संबंधित क्रेविंग आणि चिंता व्यवस्थापित करण्यास मदत करतात. या पर्यायांमध्ये हे समाविष्ट आहे:
कॅमोमाइल टी
पेपरमिंट टी
आल्याचा चहा
ग्रीन टी
लिकोरिस रूट टी
लेमनग्रास टी
४. कच्च्या भाज्या, फळे, नट्स आणि सीड्स: गाजर, सेलेरी, काकडी, चेरी टोमॅटो आणि बेल पेपर यांसारखी कच्ची भाजी खाण्याने तोंडात काहीतरी घालण्याची सवय कमी होते आणि शरीराला आवश्यक पोषणही मिळते. सफरचंद, संत्री, द्राक्षे आणि बेरी यासारखे ताजे, फ्रोजन किंवा ड्राइड फळ गोड आणि समाधानकारक पर्याय देतात. याव्यतिरिक्त, मीठ नसलेले नट्स, जसे बदाम, अक्रोड आणि पिस्ता आणि सिड्स जसे भोपळा आणि सूर्यफूलाच्या बिया हे क्रेविंग कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यासाठी प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट प्रदान करतात.
५. दुग्धजन्य पदार्थ: कॉटेज चीज किंवा ग्रीक योगर्ट सारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास निकोटीन सोडताना होणारा त्रास, क्रेविंग कमी करण्यास मदत होते. कारण त्यांची चव सिगारेटपेक्षा कमी सुखद असते. यासोबत ताजी फळे किंवा थोडीशी दालचिनी घालून खाणे हे प्रथिने युक्त आणि चांगले पर्याय ठरू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)