मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Menopause Day 2023: रजोनिवृत्तीच्या काळात वाढू लागलं वजन, लक्षात ठेवा या गोष्टी

World Menopause Day 2023: रजोनिवृत्तीच्या काळात वाढू लागलं वजन, लक्षात ठेवा या गोष्टी

Oct 18, 2023 06:18 PM IST

Why Women Gain Weight After Menopause: महिलांची मासिक पाळी थांबली की शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक बदलांना सामोरे जावे लागते आणि त्यांचे वजनही वाढते. वजन कसे कमी करायचे ते जाणून घ्या.

रजोनिवृत्तीच्या काळात वजन वाढण्याचे कारण आणि उपाय
रजोनिवृत्तीच्या काळात वजन वाढण्याचे कारण आणि उपाय

Tips to Maintain Weight After Menopause: जागतिक रजोनिवृत्ती दिन साजरा करण्याचा उद्देश महिलांमध्ये रजोनिवृत्तीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती, जेव्हा स्त्रियांची मासिक पाळी थांबते तेव्हा त्याला रजोनिवृत्ती म्हणतात. या काळात महिलांच्या शरीरात अंड्याचे उत्पादन थांबते आणि अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यामध्ये हॉट फ्लॅशपासून डिप्रेशनपर्यंत बऱ्याच गोष्टी समाविष्ट आहेत. बहुतेक स्त्रिया तक्रार करतात की रजोनिवृत्ती दरम्यान त्यांचे वजन वाढू लागते. अशा परिस्थितीत रजोनिवृत्ती हे वजन वाढण्याचे कारण कितपत आहे आणि वाढत्या वजनावर नियंत्रण कसे ठेवायचे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

रजोनिवृत्तीमुळे वजन वाढते का?

अनेक तज्ज्ञांचे असे मत आहे की स्त्रियांचे वजन वाढण्यामागे रजोनिवृत्ती हे थेट कारण नाही. त्याऐवजी रजोनिवृत्तीमुळे होणाऱ्या हार्मोनल असंतुलनामुळे शरीराचे वजन वाढू लागते, विशेषत: पोट आणि कंबरेच्या भागात चरबी. वजन वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे वयोमानामुळे कमी होणारी कामे. बहुतेक स्त्रिया वय वाढल्यानंतर शारीरिक श्रम कमी करतात. त्यामुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढू लागते.

ट्रेंडिंग न्यूज

कसे नियंत्रित करावे वजन

रजोनिवृत्तीनंतर जर कंबरेचा आकार ३५ इंचांपेक्षा जास्त असेल तर ती धोक्याची घंटा समजा. रजोनिवृत्तीनंतर ३५ इंचांपेक्षा जास्त कंबर मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकारांना आमंत्रण देऊ लागते. त्यामुळे या प्रकारचा व्यायाम निरोगी राहण्यास मदत करतो.

स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

हा एक व्यायाम आहे जो स्नायू तयार करण्यास मदत करतो. हे चयापचय प्रणाली सुधारते. तसेच हाडे मजबूत होतात. कारण वयाबरोबर हाडे कमकुवत होतात आणि त्यांची घनता कमी होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम हाडे मजबूत करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात. मशिनच्या साहाय्याने डंबेल, एक्सरसाइज बँड, योगा किंवा बागकाम हे बेस्ट स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज आहेत.

एरोबिक्स

हलका एरोबिक व्यायाम हृदय आणि फुफ्फुसांना मजबूत करतो. एरोबिक्स व्यायामात वॉक करणे हे प्रत्येकासाठी सोपे आणि सुलभ आहे. त्याशिवाय सायकल चालवणे, पोहणे, एरोबिक्स, टेनिस किंवा नृत्य हे देखील उत्तम व्यायाम आहेत. दररोज अर्धा तास किंवा त्यापेक्षा कमी एरोबिक्स व्यायाम केल्याने तंदुरुस्त राहण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.

व्यायाम सुरू करताना या गोष्टी लक्षात ठेवा

- नेहमी चांगले आणि आरामदायी शूज घालून फिरायला जा.

- स्ट्रेचिंग खूप महत्वाचे आहे. रोजच्या व्यायामापूर्वी शरीराला हलके स्ट्रेच करा.

- शरीरात नवीन ठिकाणी व्यायामामुळे वेदना होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि व्यायाम थांबवा.

- व्यायामाचा वेळ आणि तीव्रता एकदम नाही तर हळूहळू वाढवा.

- एका प्रकारचा व्यायाम केल्याने कंटाळा येतो, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करा. याचा शरीरावर अधिक आणि जलद परिणाम होईल.

आहार महत्त्वाचे

- व्यायामासोबतच सकस आहार घेणेही महत्त्वाचे आहे.

- आपल्या आहारात फळे, भाज्या तसेच संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा समावेश नक्की करा.

- तसेच अनहेल्दी, प्रक्रिया केलेल्या अन्नापासून दूर राहा.

 

- रजोनिवृत्तीच्या वयात महिलांना चहा-कॉफीचे व्यसन लागते. अशा परिस्थितीत त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे.

- वेळेवर खाणे महत्वाचे आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel