World Lion Day History and Significance: सिंहांना जगभरात "जंगलाचा राजा" म्हणून संबोधले जाते. परंतु या भव्य अशा पँथेरा सिंहांना जंगलात असंख्य धोक्यांचा सामना करावा लागत आहे. या धोक्यांमध्ये जंगलतोड किंवा शिकारीच्या धोक्यांद्वारे अधिवास नष्ट होणे, मानवांशी संघर्ष, हवामान बदल आणि त्यांच्या नैसर्गिक शिकारीचा ऱ्हास यांचा समावेश आहे. म्हणूनच त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी दरवर्षी जागतिक स्तरावर 'जागतिक सिंह दिन' साजरा केला जातो.
हा दिवस जगभरातील सिंहांसमोरील आव्हानांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच सिंह आणि जगभरातील इको सिस्टीम आणि संस्कृतींमध्ये त्यांचे महत्त्व साजरे करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करतो. दरवर्षी १० ऑगस्ट हा दिवस जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास जाणून घ्या.
जागतिक सिंह दिनाची स्थापना २०१३ मध्ये बिग कॅट रेस्क्यू या सिंहांना समर्पित जगातील सर्वात मोठ्या मान्यताप्राप्त अभयारण्याने केली होती. डेरेक आणि बेवर्ली जॉबर्ट या पती-पत्नी च्या टीमने सह-स्थापना केली होती, ज्यांनी सिंहांची घटती संख्या आणि जंगलात त्यांना भेडसावत असलेल्या धोक्यांकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता ओळखली. २००९ मध्ये ज्युबर्ट्सने "नॅशनल जिओग्राफिक" शी संपर्क साधला आणि बिग कॅट इनिशिएटिव्ह (B.C.I.) तयार करण्यासाठी त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली.
पुढे २०१३ मध्ये त्यांनी जंगलात राहणाऱ्या उर्वरित मोठ्या मांजरींचे संरक्षण करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक आणि बिग कॅट इनिशिएटिव्ह या दोन्ही संस्थांना एकाच बॅनरखाली एकत्र आणण्याचा उपक्रम सुरू केला. आणि तेव्हापासून सिंहांना भेडसावणाऱ्या संवर्धनाच्या समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी आणि या प्रतिष्ठित मोठ्या मांजरींचे सौंदर्य आणि महत्त्व साजरे करण्यासाठी दरवर्षी १० ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिन साजरा केला जातो.
जागतिक सिंह दिन हे सिंह आणि त्यांच्या संवर्धनाच्या गरजा यावर प्रकाश टाकून जंगलातील या उल्लेखनीय प्राण्यांचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी समर्थन आणि कृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्यांच्या संवर्धनाची नितांत गरज आहे. त्यामुळे या दिवसाचा उद्देश लोकांना परिसंस्थांमध्ये सिंहांचे महत्त्व आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व पटवून देणे हा आहे.
जागतिक सिंह दिनानिमित्त कला, फोटो आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सिंह आणि त्यांचे अनोखे गुण साजरे केले जातात. तर अनेक संस्था, वन्यजीव संवर्धन गट, प्राणिसंग्रहालये आणि व्यक्ती उपक्रम आणि मोहिमांमध्ये भाग घेतात किंवा या दिवसाचा उपयोग सिंह संवर्धन प्रकल्प, शिकारविरोधी प्रयत्न, अधिवास संरक्षण आणि संशोधन उपक्रमांसाठी निधी गोळा करण्यासाठी करतात. सिंह, त्यांचे वर्तन, धोके आणि संवर्धनाची रणनीती याविषयी माहिती देण्यासाठी या दिवशी अनेकदा कार्यशाळा, चर्चासत्रे, वेबिनार आणि सार्वजनिक भाषणांचे आयोजन केले जाते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जागतिक सिंह दिनानिमित्त जनजागृती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, जिथे हॅशटॅग, पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर केले जातात. तर काही प्रयत्न सिंह आणि त्यांच्या अधिवासांच्या संरक्षणासाठी मजबूत वन्यजीव संरक्षण कायदे आणि धोरणांची वकालत करण्यावर लक्ष केंद्रित करतात. तसेच स्थानिक समुदायांना सिंह संवर्धनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात. सिंह आणि मानव यांच्यातील सहजीवनास प्रोत्साहन देतात, जो दिवसाचा महत्त्वाचा पैलू आहे.