Tips to Keep Kidney Healthy: शरीरातील कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यात किडनी महत्त्वाची भूमिका बजावते.शरीरातील मीठ, पाणी आणि इतर रसायनांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, संपुर्ण मूत्रप्रणालीचे कार्य सुरळीत राखण्यास मदत करते. किडनीचे कार्य योग्यरित्या सुरु नसल्यास एखाद्याला दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार होऊ शकतो. मूत्रपिंड योग्यरित्या कार्यरत नसल्यास गंभीर मूत्रपिंडाचा आजार, किडनी स्टोन आणि मुतखडा आणि मूत्रपिंड निकामी होणे यासह अनेक गंभीर गुंतागुंत होऊ शकतात. रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या करा, जेणेकरुन वेळीच एखादी समस्या शोधण्यात मदत होऊ शकते. या महत्त्वाच्या अवयवांना होणारे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी आणि एकूणच शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी किडनीच्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. नवी मुंबई येथील मेडिकवर हॉस्पिटल्सचे नेफ्रोलॉजी तसेच किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. अमित लंगोटे यांनी किडनीचे आरोग्य राखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत.
- अनेकदा किडनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातील एक म्हणजे शरीर हायड्रेटेड राखणे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने मूत्रपिंडातील विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
- फळे, भाज्या आणि तृणधान्याने समृध्द संतुलित आहार घेतल्यास मूत्रपिंडाच्या कार्यास समर्थन देणारे आवश्यक पोषक घटक मिळू शकतात.
- किडनीच्या आरोग्यासाठी वजन नियंत्रित राखणे महत्वाचे आहे. जास्त वजनाने महत्वाच्या अवयवांवर ताण येतो. मूत्रपिंडाचा आजार असलेल्या व्यक्तींसाठी गुंतागुंत टाळण्यासाठी आणि स्थितीची प्रगती कमी करण्यासाठी वजन नियंत्रित राखणे अधिक आवश्यक आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने वजन कमी केल्यास किडनीचा आजार किंवा इतर संबंधित परिस्थिती विकसित होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. अतिरीक्त वजन कमी केल्याने उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यांसारख्या मूत्रपिंडाच्या समस्यांशी संबंधित असलेल्या लोकांसाठी लक्षणे देखील कमी होऊ शकतात.
- तुमच्या किडनीच्या आरोग्याबाबत उच्च रक्तदाब ही चिंतेची बाब आहे. हे तुमच्या मूत्रपिंडास कायमचे नुकसान करते. जर तुमचा रक्तदाब जास्त असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घ्या. मिठाचे सेवन कमी करा, रोजच्या आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा आणि नियमित व्यायाम करा.
- मधुमेह किंवा प्रीडायबिटीज असलेल्यांना किडनीचा आजार होण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा तुमचे मूत्रपिंड तुमचे रक्त फिल्टर करण्यासाठी धडपडत असते. मूत्रपिंडावर जास्त ताण आल्यास गंभीर नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करणे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांचे सेवन करणे किंवा इन्सुलिनचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
- जरी तुम्हाला मधुमेह नसेल तरी दिवसभर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवणे देखील तितकेच महत्वाचे आहे. संतुलित आहार, आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन कमी करणे. प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि फायबर्सचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
- पेन किलर औषधांचा दीर्घकालीन वापर हा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर परिणाम करतो. या औषधांच्या अतिवापराने मूत्रपिंडाचा जुनाट आजार होऊ शकतो. कारण या औषधांनी रक्तप्रवाहात अडथळे येऊन मूत्रपिंडावर ताण येतो आणि कालांतराने मूत्रपिंडाच्या ऊतींचे नुकसान होते. काही वेदनाशामक औषधे जास्त प्रमाणात वापरल्यास इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि मूत्रपिंडाचे कार्य कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
- नियमित शारीरिक हालचाली हा किडनीचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करतात. व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि एकूण रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते, जे योग्य मूत्रपिंडाच्या कार्यासाठी गरजेचे आहे.
- किडनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी धूम्रपान आणि मद्यपानासारख्या वाईट सवयी टाळा. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत वरील सोप्या टिप्सचा वापर केल्यास तुमच्या किडनीचे आरोग्य सुरक्षित राखण्यास नक्कीच मदत होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)