Effect of High Blood Pressure on Eyes: असे म्हटले जाते, की हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब हा ‘सायलेंट किलर’ आहे. डोळ्यांच्या बाबतीत तर ते आणखी खरं असतं, कारण लवकर लक्षणं दिसून न आल्यामुळे हायपरटेन्शनचे परिणाम पटकन कळून येत नाहीत. चेंबूर येथील आयुष आय क्लिनिक ए युनिट ऑफ डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटलचे कॉर्निया, मोतीबिंदू, रिफ्रॅक्टिव सर्जन डॉ. मिनल कान्हेरे यांनी उच्च रक्तबादाचा डोळ्यांवर कसा परिणाम होतो याबाबत सांगितले.
उच्च रक्तदाबामुळे जसा शरीरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो तसाच परिणाम डोळ्यातील रक्तवाहिन्यांवर सुद्धा होतो. यामुळे रेटिनामधील लहान रक्तवाहिन्या खराब होतात किंवा फुटतात. पर्यायाने हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीसारखी धोकादायक स्थिती तयार होते. रेटिनोपॅथी तीव्र होईपर्यंत रूग्णाला लक्षणं दिसतातच असे नाही. काही तीव्र केसेसमध्ये रक्तदाबात वाढ झाल्यामुळे दृष्टी अंधुक होते, दुहेरी दिसायला लागतं, ब्लाइंड स्पॉट, फ्लोटर्स तयार होतात किंवा डोकेदुखी सुरू होते. काही वेळा अचानक रक्तस्त्राव किंवा द्रव गळती झाल्यामुळे दृष्टी जाऊ शकते किंवा डोळ्यातील ऑप्टिक नर्व्हला इजा होते.
उच्च रक्तदाबामुळे ग्लुकोमा, मक्युलर डिजनरेशन किंवा रेटिनामधील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज अशा समस्या तयार होतात. यामुळे तीव्र आणि बरा न होण्यासारखा दृष्टीऱ्हास होऊ शकतो.उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, ध्रुमपान, दारूचे सेवन, ताण, हृदयविकार, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव व स्थूलत्व अशा जोखीमपूर्ण घटकांमुळे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीची शक्यता वाढते.
गरोदरपणातही उच्च रक्तदाबामुळे रेटिनोथेरपीची जोखीम वाढते. तीव्र हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची किंवा हृदय बंद पडण्याची शक्यता असते. हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीच्या उपचारांचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उच्च रक्तदाब कमी करणं.
रक्तदाबावर औषध घेणे आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे. उदा- नियमित शारीरिक हालचाल, वजनावर नियंत्रण, मिठाचे प्रमाण कमी करणे, आरोग्यपूर्ण आहार घेणे, धूम्रपान आणि दारूचे सेवन न करणे गरजेचे आहे. त्याशिवाय रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, देखरेख करणे, नेत्रतज्ज्ञ किंवा ऑप्थमॉलॉजिस्टतर्फे डोळ्यांची नियमित तपासणी करणंही महत्त्वाचे आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या