How Mental Health Affects Heart Health: आपलं हृदय आणि मेंदू हे शरीरातील दोन महत्त्वाचे अवयव आहेत, आणि ते परस्परांशी घट्टपणे जोडलेले आहेत. मानसिक आरोग्याचं हृदयाच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. परंतु आपण याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. तणाव, चिंता, आणि नैराश्य यांसारख्या मानसिक समस्यांचा हृदयावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांच्यातील हा दुवा ओळखून आपलं हृदय आणि मन दोन्ही निरोगी ठेवणं गरजेचं आहे. मुंबई येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजित बोरसे यांनी याबाबत स्पष्ट केले.
तणावाचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो. तणावाच्या स्थितीत शरीरात ‘कॉर्टिसॉल’ नावाचं हार्मोन वाढतं, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा प्रमुख जोखीम घटक आहे. दीर्घकाळ तणाव असल्यानं हृदयावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.
जास्त काळ चिंता केल्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तवाहिन्यांवर ताण येतो. हे हृदयाचे आरोग्य बिघडवू शकतं. सतत चिंता असल्यानं रक्तदाब अनियंत्रित होतो आणि त्याचा हृदयाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो.
नैराश्य म्हणजेच डिप्रेशन असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असतो. नैराश्यामुळे हृदयविकार होण्याची आणि स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. नैराश्यामुळे शारीरिक क्रियाशीलता कमी होते, योग्य आहार घेतला जात नाही, आणि व्यायामाच्या सवयी देखील बिघडतात, ज्याचा हृदयावर प्रतिकूल परिणाम होतो.
मानसिक ताण-तणावामुळे अनेकदा व्यक्ती धूम्रपान, मद्यपान किंवा जंक फूडच्या आहारी जातात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका आणखी वाढतो. तणावग्रस्त जीवनशैलीमुळे रक्तदाब वाढतो, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि शरीरावर अनावश्यक चरबी जमा होते, ज्याचा हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो.
तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यान, योगा, ब्रीदिंग टेक्निकचा वापर करावा. तणाव कमी करणाऱ्या या उपायांनी शरीरातील कॉर्टिसॉलची पातळी कमी होते आणि हृदयावरचा ताण कमी होतो.
सकारात्मक विचारसरणी आणि आशावादी दृष्टिकोनामुळे मानसिक आरोग्य सुधारते. मानसिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी मित्र-परिवारासोबत वेळ घालवणे, छंद जोपासणे, आणि स्वत:साठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे.
नियमित व्यायाम केल्याने मानसिक ताण-तणाव कमी होतो आणि शारीरिक आरोग्य सुधारते. संतुलित आहारामुळे मेंदू आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त आहार, जसे की मासे, नट्स हृदय आणि मेंदूसाठी लाभदायक असतात.
जर मानसिक ताण, चिंता किंवा नैराश्य असेल, तर मानसिक आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला घ्या. योग्य वेळेवर केलेली चिकित्सा हृदयविकाराचा धोका कमी करू शकते आणि मानसिक स्थिती सुधारू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)