Symptoms of Heart Problems: हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या अनेक आढळून येतात. ही लक्षणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यात काहीतरी गडबड असल्याचा संकेत असू शकतात. थकवा येणे, छातीत दुखणे, अतिशय घाम येणे आणि धाप लागणे यासारख्या महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने गंभीर गुंतागुंत होऊ शकते. साधारणपणे, हृदयाच्या अनेक समस्या हळूहळू विकसित होतात आणि सुरुवातीला दिसणारी ही लक्षणे चटकन दिसून येत नाहीत. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या लवकरात लवकर ओळखणे अवघड होते. घरगुती उपायांनी त्यावर उपचार केल्यास ही स्थिती आणखी बिघडू शकते. यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य बिघडू शकते.
वेळेवर निदान आणि उपचारांमुळे ही लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारख्या अनेक समस्यांचा धोका कमी करताना वेळीच तपासणी केल्याने गुंतागुंत टाळता येऊ शकते. खारघर, नवी मुंबई येथील मेडिकवर हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनुप महाजनी यांनी याविषयी माहिती दिली.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरेशी विश्रांती किंवा झोप घेतल्यानंतरही खूप थकल्यासारखे किंवा अशक्त वाटते. एखाद्याला साधी आणि सोपी कामं करण्यातही अडचणी येऊ शकतात जसे की पायऱ्या चढणे किंवा चालणे. विशेषत: स्त्रियांमध्ये असामान्य थकवा हा हृदयाच्या अनेक समस्यांचे संकेत असू शकतो.
छातीत दुखणे यासारखी लक्षणे प्रत्येक व्यक्तीच्या स्थितीनुसार बदलू शकतात. छातीत दुखणे तुमच्या हृदयाच्या एका विशिष्ट भागात दाब निर्माण करते, जडपणा येतो आणि जीव घाबरल्यासारखे वाटू लागते. काही जण या वेदनांचे वर्णन हे छातीवर वजन टाकल्यासारखे करतात. या वेदना वारंवार उद्भवू शकतात आणि काही मिनिटे किंवा तास टिकतात.
आपण शारीरिकरित्या सक्रिय असताना किंवा विश्रांती घेत असताना देखील आपल्याला श्वास घेण्यात अडचण येऊ शकते. कधी कधी तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटू शकते. तुमचे हृदय अपेक्षेपेक्षा अधिक कार्यक्षमतेने रक्त पंप करत नसल्याचे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. छातीत दुखणे यासारखी इतर लक्षणे श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, वेळेवर हस्तक्षेप करण्यासाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
याला एरिथमिया असेही म्हणतात. यावेळी तुमच्या हृदयाचा ठोका चुकणे किंवा वेगाने धावत आहे असे वाटू शकते. विश्रांती घेत असताना किंवा शारीरिक हालचाली करत असतानाही हृदयाचा लय बदलू शकतो. यामुळे तुम्हाला चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ वाटू लागते. लक्षात ठेवा एरिथमिया हे हृदयाच्या समस्या जसे की स्ट्रोक, हार्ट फेल्युअर किंवा एनजाइना यांचे लक्षण असू शकते.
काहींना त्यांच्या पायाचा घोटा किंवा पायात अचानक वेदना जाणवू शकतात. पाय फुगीर किंवा सुजलेले वाटू शकतात. ज्यामुळे चालताना अस्वस्थता येते परिणामी गतिशीलता मर्यादित होते. जेव्हा तुमचे हृदय प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही तेव्हा ही विशिष्ट सूज येते. यामुळे शरीरात द्रव जमा होऊ लागते. हे हार्ट फेल्युअर किंवा इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे संकेत असू शकते ज्याबद्दल डॉक्टरांशी त्वरित चर्चा करणे आवश्यक आहे.
ज्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे त्यांना हात, जबडा आणि मानेचे दुखणे सतावू शकते. ही चिन्हे सूचित करू शकतात की तुमच्या हृदयाच्या कार्यात अडथळे येत आहेत. अशावेळी वेळीच निदान करणे, वैद्यकिय सल्ला घेणे योग्य राहिल. हृदयाच्या समस्यांची ही काही गंभीर लक्षणे आहेत ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)