Contraceptive Pill Side Effects: जगाची लोकसंख्या ८०० कोटींच्या आसपास पोहोचली आहे. त्यामध्ये वेगाने वाढ आहे. हे थांबवण्यासाठी अनेक सरकारे आणि अनेक जागतिक संस्था सातत्याने लोकांना जागरूक करत आहेत. यासाठी दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी 'जागतिक गर्भनिरोधक दिन' साजरा केला जातो. मोठ्या संख्येने लोक गर्भनिरोधकांचा वापर करत नसल्याचे अनेक अहवालांमध्ये समोर आले आहे. आतापर्यंत तुम्ही गर्भनिरोधक औषधांबद्दल अर्थात गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल अनेकदा ऐकले असेल. गर्भनिरोधक औषधे वापरणे सुरक्षित आहे का? त्यामुळेच आज आपण जागतिक गर्भनिरोधक दिनानिमित्त, तज्ज्ञांकडून गर्भनिरोधक औषधांशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
तज्ज्ञांच्या मते, कुटुंब नियोजन किंवा गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींना गर्भनिरोधक म्हणतात. परंतु अद्याप मोठ्या प्रमाणात लोकांकडे याबाबत योग्य माहिती नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर, कुटुंब नियोजनासाठी गर्भनिरोधक हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय असू शकतो. वय आणि शरीराच्या स्थितीनुसार लोकांना याबद्दल सल्ला दिला जातो. प्रत्येक व्यक्तीसाठी हा सल्ला वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांशी चर्चा करूनच योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गर्भनिरोधकांचे ४ मुख्य प्रकार आहेत. पहिली अडथळा गर्भनिरोधक पद्धत आहे. ज्यामध्ये गर्भधारणा टाळण्यासाठी स्त्री किंवा पुरुष कंडोम वापरतात. दुसरी पद्धत म्हणजे औषधी गर्भनिरोधक, ज्याला हार्मोनल गर्भनिरोधकदेखील म्हणतात. या पद्धतीत गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या जातात. तिसरी पद्धत इंट्रायूटरिन गर्भनिरोधक उपकरण आहे. ज्यामध्ये काही उत्पादने गर्भाशयाच्या आत वापरली जातात. चौथी पद्धत सर्जिकल गर्भनिरोधक आहे, ज्यामध्ये शस्त्रक्रियेद्वारे निर्जंतुकीकरण केले जाते. या चार गर्भनिरोधक पद्धत आज चलनात आहेत.
तज्ज्ञ सांगतात की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करू नये. गर्भनिरोधक गोळ्या दोन प्रकारच्या असतात. एक सामान्य आणि दुसरी आपत्कालीन. मोठ्या संख्येने लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या वापरतात, जे धोकादायक असू शकतात. इमर्जन्सी गोळ्या आयुष्यात एक किंवा दोनदा पेक्षा जास्त घेऊ नये अन्यथा त्याचे गंभीर दुष्परिणाम होतील. जर गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जात असतील तर त्या घेणे सुरक्षित मानले जाते. तुमच्या सर्व आवश्यक शारीरिक चाचण्या केल्यानंतरच तज्ज्ञ गोळ्यांची शिफारस करतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेणे सुरक्षित नसते.
गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे अनेक वेळा पक्षाघाताच्या घटना घडतात. हे टाळण्यासाठी या गोळ्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापराव्यात. गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिवापरामुळे हायपरकोलेस्टेरेमिया, रक्ताच्या गुठळ्या आणि हार्मोनशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. वेगवेगळ्या लोकांवर त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. ही स्थिती टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गर्भनिरोधक गोळ्या घेणे योग्य असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)