मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Cancer Day: पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

World Cancer Day: पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 02, 2024 11:27 PM IST

Palliative care: कॅन्सरच्या रुग्णांसाठी पॅलिएटिव्ह केअर महत्त्वाचे म्हटले जाते. या संदर्भात तज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या.

पॅलिएटिव्ह केअर
पॅलिएटिव्ह केअर (unsplash)

Importance of Palliative Care: पॅलिएटिव्ह केअर हा वैद्यकीय सेवेचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याचा उद्देश गंभीर आजाराची लक्षणे आणि वेदना, त्यामुळे होणारा मानसिक त्रास या साऱ्यांपासून आराम मिळवणे आहे. रुग्ण आणि त्यांचे कुटुंब या दोघांचे जीवनमान सुधारणे हे त्याचे प्राथमिक ध्येय आहे. या प्रकारची काळजी डॉक्टर, नर्स आणि इतर तज्ञांच्या विशेष प्रशिक्षित टीमद्वारे प्रदान केली जाते, जे डॉक्टरांसह एकत्रितपणे कार्य करतात. पॅलिएटिव्ह केअर कोणत्याही वयात आणि गंभीर आजाराच्या कोणत्याही टप्प्यावर योग्य आहे. सातारा येथील ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर येथील डॉ. स्वप्नील देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.

जागतिक आरोग्य संघटनेचे अहवाल सांगतात, की दर वर्षी जवळपास ४० कोटी लोकांना ‘पॅलेटिव्ह केअर’ची गरज असते. त्यातील ७८ टक्के लोकसंख्या विकसनशील अथवा मागास देशांतील आहे आणि फक्त १४ टक्के लोकांनाच आता मदत मिळत आहे. पॅलिएटिव्ह केअर टीम रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करत रुग्णांची योग्य काळजी घेते. या योजनेत कर्करोगाची सामान्य लक्षणे जसे की वेदना, थकवा, भूक न लागणे, मळमळणे आणि झोपेसंबंधीत अडचणी व्यवस्थापित करणे समाविष्ट असू शकते. यात कर्करोगाच्या उपचारादरम्यान उद्भवू शकणाऱ्या मानसिक आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करणे देखील समाविष्ट आहे.

कर्करोगाच्या रुग्णांना, एड्स आणि इतर जीवघेण्या रोगांच्या बाबतीत पॅलिएटिव्ह केअर सेवा उपलब्ध करुन दिली जाते. गंभीर रोगांच्या त्रासादरम्यान, रुग्णांना मानसिक विकार देखील होतात. म्हणून त्यांच्या मानसिक समस्या दूर करण्यास पॅलिएटिव्ह केअरची मदत होते. दीर्घकालीन आजार असलेल्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे हे पॅलिएटिव्ह केअरचे मुख्य उद्दिष्ट आहे. पॅलेटिव्ह मेडिसिन देणारे डॉक्टर रुग्णाला होणारा त्रास, अथवा वेदना कशा कमी ठेवता येऊ शकतात यासाठी असतात.

पॅलिटिव्ह केअरमुळे शेवटच्या दिवसांतील जीवनमान उंचावू शकतं. यामुळे शारीरिक त्रास आणि मानसिक वेदना कमी होण्यास मदत होते. पॅलिएटिव्ह केअरमुळे रुग्णालयात मृत्युची वाट पाहणाऱ्यांची संख्याही कमी होऊ शकते. काही परिस्थितीमध्ये रुग्णास श्वासासाठी नळी घातलेली असते (Tracheostomy) त्या नळीची स्वच्छता, गरज पडल्यास ऑक्सिजन लावणे हे सर्वच काही विशिष्ट काळाच्या ट्रेनिंग नंतर रुग्णाच्या कुटुंबियांना करावे लागते. म्हणूनच पॅलिएटिव्ह केअरमध्ये केअरगिव्हर (रुग्ण नातेवाईक) ह्यांचे प्रशिक्षण हे सुद्धा खूपच महत्वाची भूमिका बजाविते. आजारपणात लढण्‍यासाठी रुग्‍ण व त्‍याचे कुटुंबीय यांचे मनोबल वाढविण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरते. रुग्‍णांच्‍या नातेवाईकांना जखमेच्‍या मलमपट्टीची माहिती देणे व मलमपट्टी करणे शिकविणे. जेणेकरुन घरी राहून सुद्धा रुग्‍णाची योग्य काळजी घेता येऊ शकते. रुग्‍णासाठी आवश्‍यक संतुलित आहार, आहार देण्‍याच्‍या पद्धती, शारिरीक स्‍वच्‍छतेबाबत माहिती देणे याचाही यात समावेश होतो.

 

आजारपणात शारिरीक समस्‍या सोबतच सामाजिक, भावनिक, आणि आर्थिक त्रासांना सुद्धा सामोरे जावे लागते. पॅलिएटिव्‍ह केअर मध्‍ये मुख्‍यतः आयुष्‍याच्‍या शेवटच्‍या टप्‍यात व कधीच बरे न होणाऱ्या रुग्‍णांचा समावेश होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel