Symptoms of Brain Tumor: जगभरात ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमरबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना शिक्षित करणे या उद्देशाने हा विशेष दिवस साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमर हा एक असाध्य रोग म्हणून पाहिला जातो. पण योग्य वेळी माहिती मिळाल्यास त्याचा उपचार शक्य आहे. डोकेदुखी हे देखील ब्रेन ट्यूमरच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. म्हणून सततच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळीच निदान करणे गरजेचे आहे. जर ब्रेन ट्यूमरमुळे डोकेदुखी होत असेल तर वेळीच हस्तक्षेप केल्यास एखाद्याचे आयुष्य वाचविता येऊ शकते.
नवी मुंबईतील मेडिकवर रूग्णालयातील सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. हरीश आर नाईक यांनी सांगितले की, 'मेंदूमध्ये ट्यूमर असलेल्या व्यक्तींमध्ये सामान्यतः डोकेदुखीची लक्षणे दिसून येतात. डोक्याच्या मागच्या भागात असलेल्या ब्रेन ट्यूमरमुळे मानदुखीसह डोकेदुखी होऊ शकते. जर मेंदूची गाठ डोक्याच्या पुढच्या भागात झाली तर डोके दुखणे किंवा सायनसचा त्रास जाणवतो. परंतु काही ब्रेन ट्यूमरमुळे डोकेदुखी होत नाही. त्यामुळे ब्रेन ट्यूमरचं निदान पटकन होत नाही. वेळीच निदान व उपचार न झाल्याने आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे डोकेदुखी व्यतिरिक्त मळमळणे, उलट्या होणे, झोपेसंबंधीच्या समस्या आणि विसर पडणे, चक्कर येणे, मूड स्विंग्ज, चालताना तसेच बोलताना अडचणी येणे किंवा ऐकू न येणे, दृष्टी आणि गंध बदलणे, संतुलन गमावणे, भावनिक अस्थिरता आणि अन्न गिळताना येणाऱ्या समस्या जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ही सुद्धा ब्रेन ट्यूमरची लक्षणं आहेत.'
झायनोव्हा शाल्बी मल्टीस्पेशालिटी रूग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. आकाश छेडा म्हणाले की, ‘डोकेदुखीसह चक्कर येणं हे सुद्धा ब्रेन ट्यूमरचं एक लक्षणं आहे. मेंदूतील गाठीमुळे डोकेदुखी सहन होत नाही. ही डोकेदुखी अनेक दिवस राहते. डोकेदुखीमुळे मळमळ, उलट्या, अस्वस्थ वाटणे, बोलता न येणं आणि शरीराच्या एका बाजूला सून्न किंवा अशक्तपणा जाणवणं हे देखील ब्रेन ट्यूमर चे लक्षण आहे. त्यामुळे अशी काही लक्षणं दिसून आल्यास लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एमआरआय, सीटीस्कॅन, पीईटी-सीटी स्कॅन आणि ट्यूमरची बायोमार्कर चाचणी करून घ्यावी. वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण लवकर बरा होऊ शकतो. ब्रेन ट्युमरवर तात्काळ शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीद्वारे उपचार उपलब्ध आहे.”
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. अमित शोभावत म्हणाले की, ‘बऱ्याच लोक डोकेदुखीकडे दुर्लक्ष करतात. परंतु, वारंवार होणारी डोकेदुखी ब्रेन ट्यूमरच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. मेंदूतील वाढत्या गाठीमुळे मेंदूजवळील निरोगी पेशींवर अतिरिक्त दबाव पडतो तेव्हा डोकेदुखी जाणवते. ट्यूमरमुळे मेंदूला सूज येऊ शकते. याशिवाय पहाटे उठल्यावर डोकेदुखी वाढते. काही लोकांना झोपेच्या वेळी डोकेदुखी होऊ शकते. आणि त्यांना मायग्रेनच्या समस्येसारख्या वेदना वाटू शकतात. डोक्याच्या मागच्या बाजूला असलेल्या ब्रेन ट्यूमरमुळे डोकेदुखी आणि मान दुखते. अशी समस्या असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.’
ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये किंवा त्याच्या जवळच्या पेशींची असामान्य वाढ किंवा त्याठिकाणी असलेले वस्तुमान. मेंदूच्या गाठी या कर्करोगाच्या असतात आणि त्या प्राणघातक ठरु शकतात. ब्रेन ट्यूमरचे अनेक प्रकार आढळून येतात तसेच वय, कौटुंबिक इतिहास, आनुवंशिकता या बाबी कर्करोगास कारणीभूत ठरतात. मळमळणे, उलट्या होणे, झोपेसंबंधीच्या समस्या आणि विसर पडणे, चक्कर येणे, मूड स्विंग्ज, चालताना तसेच बोलताना अडचणी येणे किंवा ऐकू न येणे, दृष्टी आणि गंध बदलणे, संतुलन गमावणे, भावनिक अस्थिरता आणि अन्न गिळताना येणाऱ्या समस्या ही ब्रेन ट्यूमरची लक्षणे आहेत. ब्रेन ट्यूमरच्या प्रमुख लक्षणांमध्ये डोकेदुखीचा देखील समावेश आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या