World Brain Day 2024: आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणजे आपला मेंदू. जेव्हा मेंदू व्यवस्थित काम करतो, तेव्हा शरीराची इतर कामे नैसर्गिकरित्या होऊ लागतात. त्यामुळे मेंदूची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दरवर्षी २२ जुलै रोजी जगभरात ‘जागतिक मेंदू दिन’ साजरा केला जातो. न्यूरोलॉजिकल परिस्थितीमुळे प्रभावित लोकांना शिक्षण, संशोधन आणि मदत या बाबतीत प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. जागतिक मेंदू दिनाच्या इतिहासाविषयी सांगायचे झाले तर, मेंदूच्या समस्यांची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन, २२ जुलै १९५७ रोजी वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीची स्थापना करण्यात आली. पब्लिक अवेअरनेस आणि ॲडव्होकसी कमिटीने एक सूचना केली, ज्यामुळे २२ जुलै रोजी जागतिक मेंदू दिन साजरा करण्यात आला. या अंतर्गत दरवर्षी वेगळ्या थीमवर हा दिवस साजरा केला जातो. याच खास निमित्ताने जाणून घेऊया मेंदूची काळजी घेण्याच्या काही खास टिप्स...
> निरोगी मेंदूसाठी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे आवश्यक आहे. जर, तुम्ही शारीरिकदृष्ट्या वारंवार आजारी पडत असाल तर, त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरही होतो. मानसिक क्रियाकलाप, कार्यक्षमता आणि उत्पादकता प्रभावित होतात. म्हणून, आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी, निरोगी जीवनशैली आणि सकस आहार आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा.
> तणावापासून दूर राहून आपण आपले मन निरोगी ठेवू शकतो. यासाठी योगा आणि ध्यान करा. योगामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहील आणि ध्यान केल्याने तुमचे मनही शांत राहील.
> निरोगी मेंदूसाठी चांगली झोप महत्त्वाची आहे. जर, कोणत्याही कारणास्तव तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल, तर झोपेच्या कमतरतेचा तुमच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियमितपणे किमान आठ तासांची झोप घ्या.
> तुम्हाला दारू, सिगारेट, तंबाखूचे व्यसन असेल, तर त्याचा तुमच्या मेंदूवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे या सगळ्यांसोबतच फास्ट फूड आणि जंक फूडही टाळा.
> झोपण्याच्या दोन तास आधी स्क्रीन टाईम कटाक्षाने टाळा.
> झोपण्यापूर्वी निकोटीन आणि कॅफिन सारख्या उत्तेजक पदार्थांचे सेवन टाळा.
> तुमच्या दररोजच्या आहारात अक्रोड, बदाम आणि अळशीच्या बियांचा समावेश करा.
> एखाद्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचा विचार करणे, जटील कोडी सोडवणे आणि त्यासाठी मेंदूची शक्ती वापरणे, यामुळे आपण मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या