Tips to Manage Asthma: दमा हा एक श्वसनाचा आजार आहे. ज्यामध्ये वायुमार्ग अरुंद होतो आणि सूज येते. ज्यामुळे छातीत घरघर, दम लागणे, छातीत घट्टपणा आणि खोकला येतो. दम्याची कारणे तणाव, धुम्रपान, पराग कण, धूळ, पाळीव प्राण्यांच्या केसातील कोंडा, रसायने आणि प्रदूषणाचा संपर्क, सायनुसायटिस श्वसन संक्रमणासारख्या समस्या आढळून येतात. देशात या आजाराचे प्रमाण वाढत असून त्यामुळे विकृती आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या स्थितीचे अचूक निदान करणे तसेच उपचाराबाबत स्वतःला साक्षर करणे गरजेचे आहे. परेल येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सचे संचालक - पल्मोनोलॉजी अँड लंग ट्रान्सप्लांट डॉ. समीर गर्दे यांनी दम्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी टिप्स दिल्या आहेत.
या दीर्घकालीन स्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. या आजाराबाबत योग्य शिक्षण मिळाल्यास दम्याचा त्रास असलेले रुग्ण त्यांचे ट्रिगर आणि लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि कोणत्याही अडचणीशिवाय रोगाचे व्यवस्थापन करू शकतात. वेळीच लक्षणे ओळखून भविष्यातली गुंतागुंत टाळता येऊ शकते. तुमच्या आरोग्याच्या स्थितीबाबत तुमच्या डॉक्टरांना पुरेशी माहिती देणे आवश्यक आहे आणि अस्थमाच्या लक्षणांना चालना देणाऱ्या एलर्जीविषयी जागरुक असणे गरजेचे आहे. घरात धूळ आणि पाळीव प्राण्यांचा कोंडा टाळा, घराला स्वच्छ ठेवा आणि वायू प्रदूषण आणि रसायनांच्या संपर्कात येण्यापासून स्वतःला रोखा. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती शिबिरे, उपक्रम आणि शैक्षणिक सत्रे राबविल्यास या आजाराबाबत जनजागृती करता येऊ शकते.
दम्याची सौम्य लक्षणे जसे की छातीत घरघर होणे हे इनहेलरने हाताळले जाऊ शकते. परंतु एखाद्याला तीव्र लक्षणे आढळल्यास किंवा सततच्या लक्षणांचा मागोवा ठेवावा लागेल, ज्यामुळे पुढील आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दम्याचा उपचार वेळीच न केल्यास नैराश्य येऊ शकते आणि वायुमार्गाचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. वारंवार दम्याचा झटका येत असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दैनंदिन क्रियाकलाप करण्यात अडचण येत असेल, तर विलंब न करता वैद्यकीय सल्ला घ्या. जर तुमच्या दम्याची लक्षणे तुमच्या झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणत आहेत किंवा चिंता आणि तणाव निर्माण करत आहेत, तर पुढील मूल्यांकन आणि मार्गदर्शनासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. वैद्यकिय तज्ञांच्या सल्ल्याने तुम्हाला योग्य उपचार मिळू शकतात, जसे की तुमच्या वैयक्तिक गरजांनुसार तुम्हाला औषधांचा योग्य डोसमध्ये मिळू शकतो. अस्थमाच्या रुग्णांनी तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या