Breastfeeding: वर्किंग महिलांनी स्तनपान करताना घ्यावी विशेष काळजी, जाणून घ्या फायदे-working women should take care while breastfeeding know the benefits ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breastfeeding: वर्किंग महिलांनी स्तनपान करताना घ्यावी विशेष काळजी, जाणून घ्या फायदे

Breastfeeding: वर्किंग महिलांनी स्तनपान करताना घ्यावी विशेष काळजी, जाणून घ्या फायदे

Aug 05, 2024 09:14 PM IST

Breastfeeding Week 2024: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. वर्किग महिलांनी स्तनपान करताना काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या.

वर्किंग महिलांनी स्तनपान करण्यासाठी टिप्स
वर्किंग महिलांनी स्तनपान करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips for Working Women for Breastfeeding: बाळाला जन्मानंतर कमीत कमी ६ महिन्यांपर्यंत म्हणजे १८० दिवस बाळाला स्तनपान अतिशय गरजेचं असते. हे स्तनपान किमान २ वर्षापर्यंत सुरु ठेवता येते. वर्किंग महिलांना कामावरून थकुन आल्यावर आपल्या बाळाला स्तनपान करणे आव्हानात्मक वाटू शकते. मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलच्या स्तनपान विशेष तज्ज्ञ स्वाती टेमकर यांनी स्तनपान करणाऱ्या नोकरदार महिलांसाठी काही खास टिप्स दिल्या. स्तनपानामुळे आई-बाळामधील नातेसंबंध दृढ होतात.

हे आहेत स्तनपानाचे फायदे

- बाळाची वाढ आणि विकासासाठी सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळतात

- पचण्यास सोपे

- आईचे दूध निर्जंतुक असल्याने बाळाला जंतुसंसर्ग होत नाही.

- मातेच्या दुधातील प्रतिबंधक द्रव्यांमुळे बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम राहते आणि विविध आजारांपासून बाळाचे संरक्षण करते. उदा. न्यूमोनिया, अतिसार, दमा आणि एलर्जी इत्यादी

- आईच्या शरीराच्या तापमानानुसार दुधाचे तापमान असते, जे बाळासाठी योग्य असते.

- बाळाच्या बौद्धीक वाढीसाठी उपयुक्त

- भविष्यात लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेहापासून संरक्षण करते

- काही ठराविक कर्करोगाचा धोका कमी होतो

- आई आणि बाळाचे नाते घट्ट होते

पुन्हा कामावर रुजु झाल्यानंतर स्तनपान कसे करावे?

- शक्य असल्यास आईने जास्तीत जास्त काळ प्रसूती रजा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरून काम करणे, अर्ध वेळ काम करणे, आठवड्यातून तीनदा काम करणे किंवा जवळच्या शाखेत ट्रान्सफर करणे अशा पर्यायाचा अवलंब करा.

- शक्य असल्यास आईने बाळाला स्तनपान करण्यासाठी घरी येण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा अनेक संस्था क्रेच सुविधा, हिरकणी कक्ष प्रदान करतात जिथे आई आपल्या बाळाला स्तनपान करू शकतात.

- काढून ठेवलेले आईचे दूध खोलीच्या तपमानावर चार-सहा तास ताजे राहते आणि रेफ्रिजरेटरमध्ये (चिलर कंपार्टमेंट) ठेवल्यास चोवीस तास टिकते. फ्रीजमधील थंड दूध थेट गॅसवर गरम करू नये. उन्हाळ्यात, ते खोलीच्या तपमानावर येऊ द्यावे अथवा ते गरम पाणी असलेल्या भांड्यात ठेवावे.

- कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाचा आधार मिळू शकतो. हिरकणी कक्ष असेल तर तेथे बसून बाटलीत दूध साठवून घरी गेल्यावर बाळाला पाजू शकता.

- वेगवेगळ्या ब्रेस्टपंपच्या मदतीने आई तिच्या बाळासाठी दूध काढून ठेवू शकते. आईचं बाटलीमध्ये काढलेलं दूध बाळाला देतांना मात्र सिरिंज, वाटी चमच्याने द्यायला हवं आणि बाटलीचा वापर करू नये.

पूरक आहार

बाळाला वयाच्या ६ महिन्यांनंतर मऊ, ताजे, घरी तयार केलेले अन्न देण्यास सुरूवात करा. बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवा. पूरक आहारासंबंधीत समुपदेशनासाठी स्तनपान विशेष तज्ज्ञांना भेट द्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)