Women's Health: एकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी आलीय? असू शकतात ही गंभीर कारणे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Women's Health: एकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी आलीय? असू शकतात ही गंभीर कारणे

Women's Health: एकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी आलीय? असू शकतात ही गंभीर कारणे

Published Oct 23, 2024 11:13 AM IST

Twice a Month Periods: काही महिलांमध्ये मासिक पाळी सुरू झाल्यानंतर १०ते १५ दिवसांनंतर असामान्य रक्तस्त्राव होतो. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर चुकूनही दुर्लक्ष करू नका.

Twice a Month Menstruation
Twice a Month Menstruation (freepik)

Twice a Month Menstruation:  बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी अनियमित असते, कधीकधी त्यांना २ महिन्यांनी पाळी येते तर काही स्त्रियांना ३ महिन्यांनंतर येते. पण काही महिला अशा आहेत ज्यांना महिन्यातून दोनदा मासिक पाळी येते. तर काही महिलांमध्ये मासिक पाळी सुरू झाल्यानंतर १०ते १५ दिवसांनंतर असामान्य रक्तस्त्राव होतो. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर चुकूनही दुर्लक्ष करू नका. मासिक पाळी दरम्यान असामान्य रक्तस्त्राव होणे किंवा महिन्यातून दोनदा मासिक पाळी येणे हे गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते.

काय आहे कारण?

तज्ज्ञांच्या मते, बऱ्याच स्त्रियांसाठी, एकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी येणे चिंताजनक आणि धक्कादायक असू शकते. यामागे अनेक कारणे आहेत, काहींसाठी हे सामान्य असू शकते, परंतु काही स्त्रियांच्या बाबतीत हे गंभीर वैद्यकीय स्थितीचे लक्षण असू शकते.

हार्मोनल असंतुलन-

हार्मोनल असंतुलन हे अनियमित मासिक पाळीचे एक सामान्य कारण आहे. मासिक पाळी थांबणे किंवा महिन्यातून दोनदा येणे हे थायरॉईड समस्या किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS) सारख्या आजारांमुळे असू शकते.

वजनातील चढउतारांमुळे-

अनेक वेळा स्त्रिया कोणत्या ना कोणत्या कारणाने जास्त ताणतणाव घेतात किंवा चिंतेसारख्या मानसिक स्थितीला बळी पडतात. त्याच वेळी, महिलांमध्ये वजनात अचानक चढ-उतार होऊ शकतात. ताणतणाव, वजनातील चढउतार आणि जास्त व्यायामामुळे हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होतो. परिणामी मासिक पाळी अनियमित होते. जर मासिक पाळी १ महिन्यात दोनदा येत असेल तर हे एक संभाव्य कारण असू शकते.

संसर्ग किंवा गर्भाशयाच्या समस्या-

संसर्ग किंवा गर्भाशयाच्या समस्या, जसे की फायब्रॉइड्स किंवा पॉलीप्समुळेदेखील अनियमित रक्तस्त्राव होऊ शकतो. बऱ्याच वेळा स्त्रियांना गर्भाशयाच्या समस्या आणि संसर्गाचे निदान उशिराने होते. यामुळे, उपचार सुरू न केल्यास, महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते किंवा काही वेळा असामान्य रक्तस्त्राव होऊ शकतो.

पेरीमेनोपॉज दरम्यान-

पेरीमेनोपॉज, जो रजोनिवृत्तीपूर्वीचा काळ आहे. हा एक कालावधी आहे ज्या दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात, विशेषत: जेव्हा त्यांच्या पुनरुत्पादक आणि लैंगिक हार्मोन्समध्ये लक्षणीय चढ-उतार होतात. या काळात अनेक महिलांना केवळ १५ दिवसांच्या अंतराने मासिक पाळी येते. पेरीमेनोपॉजच्या वेळेमुळे महिन्यातून दोनदा मासिक पाळी येऊ शकते.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

Whats_app_banner