Women Health Menopause Symptoms : रजोनिवृत्ती ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये स्त्रियांची मासिक पाळीची प्रक्रिया थांबते. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात मासिक पाळी अतिशय महत्वाची आहे. या मासिक पाळीसोबतच प्रत्येक महिलेला रजोनिवृत्तीच्या अर्थात मेनोपॉजच्या टप्प्यातून जावेच लागते. त्यामुळे, रजोनिवृत्तीचा टप्पा हा महिलांसाठी अतिशय महत्वाचा आहे. रजोनिवृत्तीची सुरूवात होणे म्हणजे प्रत्येक महिन्याला येणारी मासिक पाळी पूर्ण बंद होणे. याच प्रक्रियेला मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती असे म्हटले जाते.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मधुलिका सिंह म्हणतात की, रजोनिवृत्तीच्या काळामध्ये महिलांमध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी कमी होण्याची शक्यता असते. या दरम्यान स्त्रियांमधील प्रजननाची प्रक्रिया थांबते. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरात प्रचंड शारीरिक आणि मानसिक बदल होतात. रजोनिवृत्तीचे तीन टप्पे असतात. ते म्हणजे प्री-मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्टमेनोपॉज. मेनोपॉज हा साधारण महिलांना वयाच्या ४५ ते ५५ या वयोगटात सुरू होतो. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच, काही वैद्यकीय परिस्थितींमुळे काही महिलांमध्ये हा टप्पा हे नेहमीपेक्षा लवकर सुरू होऊ शकते. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या संप्रेरकांची घट होण्यास सुरुवात होते व हार्मोनल असंतुलन होते. रजोनिवृत्ती दरम्यान स्त्रियांना अनेक लक्षणे जाणवतात. या लक्षणांची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलू शकते. ही लक्षणे वेळीच ओळखून या टप्प्याला सामोरे जाणे सोपे होऊ शकते.
हॉट फ्लॅश हे रजोनिवृत्तीशी संबंधित सर्वात सामान्य लक्षण आहे. यामुळे एखाद्याला तीव्र घाम येणे आणि अस्वस्थता जाणवू शकते. हे हॉट फ्लॅश साधारणपणे काही मिनिटे ते अनेक तास टिकते. त्यांच्यासोबत अनेकदा हृदयाचा ठोका अनियमित होणे आणि डोकेदुखी अशी लक्षणे आढळून येऊ शकतात.
रजोनिवृत्ती जवळ येत असताना, स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीत अनियमितता येऊ शकते. हे मुख्यतः शरीरातील हार्मोनल बदलांमुळे होते. याचा अर्थ असा की, मासिक पाळी नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त काळ येऊ शकते आणि रक्तप्रवाह जास्त किंवा कमी होतो.
रात्रीचा घाम येणे हा प्रकार रात्री झोपताना दिसून येतो. यामुळे एखादी व्यक्ती पूर्णपणे घामाने भिजलेली दिसते, ज्यामुळे झोप लागणे कठीण होते. याचा एखाद्याच्या मनःस्थितीवर आणि उर्जेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.
रजोनिवृत्ती ही मूड स्विंग्स सारखीच असते. एखाद्याला अचानक एका क्षणी अत्यंत दुःखी आणि दुसऱ्या क्षणी आनंदी वाटू शकते. हे तुमच्यासाठी तसेच तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरु शकते. हे एखाद्याच्या वैयक्तिक नातेसंबंधांवर आणि दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम करते.
संबंधित बातम्या