Green Peas Kachori Recipe: हिवाळ्याच्या नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत आणि गरमागरम पदार्थ खावेसे वाटते. तुम्हालाही संध्याकाळच्या चहासोबत असेच काही खाण्याची इच्छा होत असेल तर मटर कचोरीची ही रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी फक्त खायला टेस्टी नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर जाणून घ्या घरी कशी बनवायची मटर कचोरी.
- दीड कप मैदा
- अर्धा कप गव्हाचे पीठ
- मीठ (चवीनुसार)
- २ चमचे तेल
- दीड कप हिरवे वाटाणे (उकडलेले आणि जाडसर बारीक केलेले)
- २ चमचे बेसन
-२ चमचे तेल
- १/२ टीस्पून हिंग
- १ टीस्पून जिरे
- १ टीस्पून आले (किसलेले)
- १/२ टीस्पून धने पावडर
- १ टीस्पून बडीशेप पावडर
- १ टीस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून गरम मसाला
- १/२ टीस्पून आमचूर पावडर
- १ टीस्पून हिरवी मिरची (चिरलेली)
- २ टीस्पून कोथिंबीर (चिरलेली)
- मीठ (चवीनुसार)
मटर कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम कचोरीचे पीठ तयार करा. त्यासाठी एका भांड्यात मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि २ टेबलस्पून तेल एकत्र करा. आता थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. पीठ झाकून बाजूला ठेवा. आता सारण बनवण्यासाठी प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग व जिरे टाका आणि थोडा वेळ तडतडू द्या. यानंतर त्यात वाटाणे, धने पूड, बडीशेप, लाल तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून २-३ मिनिटे परतून घ्या. यानंतर आले आणि बेसन घालून एक मिनिट परतून घ्या. आता पॅन गॅसवरून काढून टाका आणि सारण थंड करण्यासाठी ठेवा.
आता कचोरी बनवण्यासाठी प्रथम पिठापासून लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा. यानंतर एका गोळ्यावर कोरडे पीठ लावून तो लाटून घ्या. मध्यभागी एक चमचा वाटाण्याचे सारण ठेवा आणि सर्व बाजू एकत्र करुन बंद करा. यानंतर त्यावर पुन्हा कोरडे पीठ लावा आणि गोल लाटून घ्या. आता एका कढईत तेल गरम करा. त्यात लाटलेल्या कचोऱ्या टाका. गॅसची फ्लेम कमी ठेवा. कचोरी दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तुमच्या मटर कचोरी तयार आहे. गरमा गरम कचोरी चहा, हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.
संबंधित बातम्या