Methi With Chana Dal Recipe: थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. त्यातही मेथीची भाजी आवडीने खाल्ली जाते. मेथीचे पराठे, आलू मेथी, लसूणी मेथी असे अनेक पदार्थ बनवून खायला सर्वांनाच आवडते. मेथी फक्त टेस्टी नाही तर ते आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. तुम्हाला जर मेथीची काही वेगळी डिश ट्राय करायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही चणा डाळीसोबत मेथीची भाजी बनवू शकता. ते कसे बनवायचे येथे जाणून घ्या.
- चणा डाळ १ कप
- मेथीची पाने १ कप
- बारीक चिरलेला कांदा १
- बारीक चिरलेला टोमॅटो १
- सुकी लाल मिरची २
- लाल तिखट १ टीस्पून
- हळद १ टीस्पून
- धने पावडर १ टीस्पून
- तूप १ टीस्पून
- जिरे १ टीस्पून
- हिंग १/४ टीस्पून
- तेल आवश्यकतेनुसार
- मीठ चवीनुसार
ही भाजी बनवण्यासाठी प्रथम चणा डाळ नीट धुवून तीन कप पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. यादरम्यान मेथीची पाने तोडून स्वच्छ धुवा आणि बारीक चिरून घ्या. आता एका कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात मेथी घाला. मेथीची पाने मऊ झाली की गॅस बंद करा. आता कुकरमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात हिंग घाला. हिंगाचा वास आल्यावर त्यात कांदा घालून ते सोनेरी होईपर्यंत शिजवा. आता त्यात टोमॅटो, लाल तिखट, धनेपूड आणि हळद घालून मध्यम आचेवर शिजवून घ्या. आता चणा डाळ पाणीसोबतच कुकरमध्ये टाका आणि मिक्स करा. चवीनुसार मीठ घालून कुकर बंद करा. मध्यम आचेवर पाच ते आठ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. गॅस बंद करा आणि कुकरचा प्रेशर स्वतः निघू द्या. कुकरचा प्रेशर निघाल्यावर चणा डाळ चांगली मॅश करा. आता डाळीत शिजलेली मेथी घालून मिक्स करा.
आता तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा. त्यात जिरे आणि सुक्या लाल मिरच्या घाला. आता हा तडका चणा डाळ आणि मेथीच्या मिश्रणावर टाकून मिक्स करा. तुमची चणा मेथी डाळ भाजी तयार आहे. पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा.