History and Importance of Valentine's Day: प्रेम करणाऱ्या प्रत्येक हृदयासाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. लव्ह बर्ड्स या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. याच महिन्यात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीला रोझ डेने व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात होऊन १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेने समाप्त होतो. व्हॅलेंटाईन डे वर लोक त्यांच्या पार्टनरला स्पेशल फील देण्यासाठी गिफ्ट देतात आणि त्यांच्यासोबत हँग आउट करण्याचे प्लॅन करून त्यांना सरप्राईज देतात. पण तुम्हाला माहित आहे का की व्हॅलेंटाईन डे फक्त १४ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? सेंट व्हॅलेंटाईन कोण होता? व्हॅलेंटाईन डेचा इतिहास काय आहे आणि तो साजरा करण्यामागील खरी सुंदर कथा काय आहे ते जाणून घेऊया.
व्हॅलेंटाईन डे दरवर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात साजरा केला जातो. ज्याची सुरुवात रोमन राजा क्लॉडियसच्या काळात झाली. असे म्हणतात की त्या काळी रोममध्ये सेंट व्हॅलेंटाइन नावाचा एक धर्मगुरू होता. व्हॅलेंटाईन डेची ही कहाणी त्यांच्या प्रेमाला आणि त्यागाला समर्पित आहे. ज्यांच्या नावाने नंतर व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाऊ लागला.
खरं तर राजा क्लॉडियसचा असा विश्वास होता की प्रेम आणि विवाह पुरुषांच्या शक्तीचा नाश करतात. या विचारामुळे त्यांनी आपल्या राज्यात एक आदेशही काढला की राज्यातील अधिकारी आणि सैनिक लग्न करू शकत नाहीत. पण त्याउलट सेंट व्हॅलेंटाईन नेहमीच जगात प्रेम वाढवण्याबद्दल बोलत असे. जेव्हा सेंट व्हॅलेंटाईनला राजाचा हा आदेश कळला तेव्हा त्याने विरोध केला. त्यांनी अनेक सैन्य अधिकारी आणि सैनिकांची लग्ने करून दिली. जेव्हा राजाला हे कळले तेव्हा त्याने १४ फेब्रुवारी २६९ रोजी सेंट व्हॅलेंटाइनला फाशी दिली. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याच्या बलिदानाचा सन्मान केला आणि त्याच्या स्मरणार्थ व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा निर्णय घेतला.
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची सुरुवात रोमन सणापासून झाली. ४९६ साली जगात प्रथमच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. त्यानंतर पाचव्या शतकात रोमच्या पोप गेलेसियस यांनी १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. या दिवसापासून रोमसह जगभरात दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस मोठ्या थाटामाटात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)