
डोळे कोरडे होणे, ही अशी अवस्था असते जेव्हा डोळ्यांत पुरेशा प्रमाणात अश्रू तयार होत नाहीत किंवा डोळ्यांत तयार होणाऱ्या अश्रूंची गुणवत्ता डोळ्यांचा पृष्ठभाग पुरेसा ओलसर ठेवण्यासाठी पुरेशी नसते. यामुळे डोळे चुरचुरणे, लालसरपणा आणि अस्वस्थता जाणवते. पिंपरी - चिंचवड येथील डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटलच्या सल्लागार नेत्रतज्ञ डॉ. धनश्री वानखेडे यांनी कामाच्या ठिकाणच्या वातावरणामुळे डोळे कसे कोरडे होतात हे सांगितले.
डोळे कोरडे होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात?
कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संगणकाच्या स्क्रीनमुळेही डोळे कोरडे होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
तुम्ही दिवसाचा बराचसा वेळ स्क्रीनसमोर घालवत असाल, तर तुमचे पापण्यांची उघडझाप कमी होते. त्यामुळे डोळ्यांना आवश्यक असलेला ओलावा कमी होतो.
सामान्यतः मिनिटाला १४ ते १५ वेळा पापण्यांची उघडझाप होते. त्यामुळे अश्रूंचा एकसंध थर डोळ्यांवर पसरतो आणि डोळे ओलसर राहतात. पण स्क्रीनसमोर सतत बसल्यामुळे पापण्यांची उघडझाप होण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी डोळ्यांतील अश्रूंचे बाष्पीभवन लवकर होते आणि डोळे कोरडे होतात.
एसीचा वापर प्रमाणापेक्षा जास्त केल्यानेही हवेतील ओलसरपणा कमी झाल्याने डोळे कोरडे होतात. परिणामी, अश्रूंचे बाष्पीभवन वेगाने होते.
अंधारात स्क्रीन वापरल्यास डोळ्यांवर अधिक ताण येतो आणि त्रास जाणवतो.
तसेच, स्क्रीन जर डोळ्यांच्या तुलनेत जास्त उंचीवर किंवा खूप दूर ठेवली असेल, तर डोळ्यांचा अधिक भाग उघडा असतो आणि पापण्यांची उघडझाप करण्याची क्षमता कमी होते.
डोळे लाल होणे, कंड येणे, थकवा येणे किंवा दृष्टी कमी होणे ही डोळे कोरडे होण्याची लक्षणे आहेत.
यावर काय उपाय आहे :
- तुमचा खूप वेळ स्क्रीनसमोर जात असेल तर दर २० मिनिटांनी २० सेकंदांचा ब्रेक घ्या आणि २० फुट लांब असलेल्या एखाद्या वस्तूकडे पाहा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने ल्युब्रिकंट ड्रॉप्सचा वापरही करत येऊ शकतो.
- डोळ्यांची नियमित तपासणी करावी.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
