Children's Day Significance: भारतात दरवर्षी १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (pandit jawaharlal nehru) यांचा जन्मदिवसही साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरूंना मुलांवर खूप प्रेम होते त्यामुळे मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून संबोधत असत. यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी बालदिन भारतात साजरा केला जात होता, परंतु १९६४ साली माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून घोषित करण्यात आला. मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता वाढवणे हा देखील या दिवसाचा उद्देश आहे.
बालदिन साजरा करण्याचे महत्त्व मुलांशी संबंधित आहे. मुलांना योग्य शिक्षण, पोषण, चांगले बालपण आणि त्यांच्यातील कलागुण दाखविण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी दरवर्षी विशेषत: बालदिनानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी मुले त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करतात. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, मुलांना नृत्य, गाण्याची आणि भाषणे देण्याची संधी मिळते.कथालेखन, निबंध लेखन आणि कविता लेखनासोबतच मुलांना कविता वाचनाची संधीही दिली जाते. मुलांनाही या दिवशी शाळेत मिळणारे खाद्यपदार्थ आवडतात.
दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस मुलांसाठी अविस्मरणीय ठरतो. या दिवशी ते त्यांची सामाजिक कौशल्ये सुधारू शकतात आणि खेळ आणि फंक्शन्समध्ये मनापासून कामगिरी करू शकतात. शाळांव्यतिरिक्त महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्येही बालदिनाचे आयोजन केले जाते.
जवाहरलाल नेहरूंनी मुलांच्या शिक्षणाला चालना दिली, त्यामुळे त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs) स्थापन करण्यावर भर दिला. याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरूंचा विश्वास होता की मुलांना चांगले शिक्षण आणि बालपण मिळाले पाहिजे कारण ते आपले भविष्य आहेत आणि देशाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)