Spreading Symptoms and Prevention of Monkeypox: कोरोना महामारीनंतर भारतातील लोक आता कुठे स्थिरावत आहेत आणि त्यातच मंकीपॉक्स व्हायरसने सुद्धा पाय पसरायला सुरुवात केली. जगभरात या विषाणूची लागण झालेल्यांची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आता डब्ल्यूएचओनेही याला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी घोषित केले आहे. डब्ल्यूएचओने दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. या समस्येबाबत प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. आज आम्ही एमपॉक्स (MPOX म्हणजे काय, ते कसं पसरत आहे आणि कसे टाळावे हे सांगत आहोत. जाणून घ्या सविस्तर
मंकीपॉक्स हा स्मॉल पॉक्ससारखा व्हायरल आजार आहे. त्याचे नाव मंकीपॉक्स असू शकते, परंतु त्याचा माकडाशी काहीही संबंध नाही. हे स्मॉल पॉक्स कुटुंबाशी संबंधित समस्या आहे. मंकीपॉक्स विषाणूची ओळख सर्वप्रथम १९५८ मध्ये झाली जेव्हा संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये चेचकसारख्या आजाराची लक्षणे आढळली. १९७० मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर २०२२ मध्ये एमपॉक्स जगभरात पसरला.
हे हवेत पसरत नाही. रुग्णाच्या संपर्कातून, संक्रमित व्यक्तीच्या पुरळ किंवा फोडांतील पाण्याच्या संपर्कातून आणि लैंगिक संबंधांद्वारे याचा प्रसार होतो. दूषित चादर, टॉवेल, कपडे यांच्या माध्यमातूनही ही समस्या पसरू शकते.
एमपॉक्सच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये ताप आणि नंतर शरीरावर पुरळ येणे यांचा समावेश आहे. जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा पुरळ प्रथम चेहऱ्यावर दिसून येतात, जे नंतर संपूर्ण शरीरात पसरू शकतात. या विषाणूची लागण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला ताप, तीव्र डोकेदुखी, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. काही लोकांना घसा, डोळे आणि प्रायव्हेट पार्टवर देखील पुरळ येऊ शकते. एमपॉक्स आणि व्हायरल फिव्हरची लक्षणे सारखीच असतात, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
या विषाणूपासून वाचण्यासाठी ज्या लोकांचे पुरळ एमपॉक्ससारखे दिसत असतील त्यांच्या जवळ जाणे टाळावे. तसेच संक्रमित प्राणी किंवा व्यक्तीच्या संपर्कात आलेले कपडे, चादरी, ब्लँकेट किंवा इतर गोष्टींना स्पर्श करणे टाळावे. साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. हात धुण्याची व्यवस्था नसल्यास अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरचा वापर करावा. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, आपल्याला लक्षणे माहित असणे आणि स्वत:ला तपासणे महत्वाचे आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)