Whiten Teeth Tips: आता पिवळ्या दातांची काळजी नको! 'हे' सोपे उपाय हिऱ्यासारखे चमकवतील तुमचे दात
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Whiten Teeth Tips: आता पिवळ्या दातांची काळजी नको! 'हे' सोपे उपाय हिऱ्यासारखे चमकवतील तुमचे दात

Whiten Teeth Tips: आता पिवळ्या दातांची काळजी नको! 'हे' सोपे उपाय हिऱ्यासारखे चमकवतील तुमचे दात

Published Jul 26, 2024 09:36 AM IST

Tips for Whiten Teeth: वयानुसार काहींना विविध समस्या उद्भवतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे दात पिवळे होणे होय. आजकाल अनेकांना दात पिवळे होण्याची समस्या दिसून येते.

दातांवरचा पिवळेपणा घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय
दातांवरचा पिवळेपणा घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Effective Tips for Whiten Teeth: 'स्वच्छ शरीर, सुंदर शरीर' असे आपण नेहमीच म्हणत असतो. आपण ज्याप्रमाणे आपल्या कपड्यांची आपल्या फॅशनची दखल घेत असतो. त्याचप्रमाणे दररोज आपण आपल्या शरीराच्या अवयवांची दखल घेणे गरजेचे असते. नियमितपणे आपले कान, नाक, नखे आणि दात साफ करणे चांगले असते. असे केल्याने आपल्या शरीराची निगा राखली जाते. या गोष्टी आपल्याला अगदी शालेय वयापासून मनावर बिंबवल्या जातात. जवळपास सर्वच लोक नियमित या गोष्टींची काळजी घेत असतात. 

मात्र वयानुसार काहींना विविध समस्या उद्भवतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे दात पिवळे होणे होय. आजकाल अनेकांना दात पिवळे होण्याची समस्या दिसून येते. काहीवेळा त्या लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. लोकांमध्ये मोकळेपणाने बोलण्यास किंवा हसण्यास त्यांना न्यूनगंड निर्माण होतो. अनेकजण विविध महागड्या ट्रीटमेंट घेतात, विविध महागडे प्रॉडक्टस वापरतात. मात्र आता या गोष्टीची काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण आता घरच्या घरी तुम्हाला सोप्या पद्धतीने दातांचा पिवळेपणा घालवता येईल. आज आपण दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

लवंग

भारतीय स्वयंपाकघरात लवंग हा पदार्थ आवर्जून आढळतो. लवंग जेवणाचा आस्वाद वाढवण्यासाठी जितका महत्वचा आहे तितकाच तो वैद्यकीयदृष्ट्यादेखील खास आहे. लवंगमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. शिवाय लवंग तेलाने दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते. तसेच तोंडाची दुर्गंधीसुद्धा नाहीशी होते. लवंगची पावडर करून त्यात थोडे जैतुन तेल मिक्स करून ती पेस्ट नियमित दातांना लावल्यास दातांचा पिवळेपणा दूर होऊन दात चमकदार बनतात.

तुळशी

हिंदू संस्कृतीत तुळशीच्या रोपाला फारच पवित्र समजले जाते. तुळशीला प्रचंड मोठे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व आहे. मात्र तुळशीचे वैद्यकीय महत्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. तुळशीचा वापर विविध औषधांपासून ते विविध सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो.विशेष म्हणजे जवळपास तुळशीचे रोप सर्वांच्याच अंगणात आढळते. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि दात निरोगी ठेवण्यासाठी तुळशी अत्यंत फायदेशीर आहे. तुळशीची पाने बारीक वाटून त्याची पावडर बनवून त्याने दात घासल्यास काहीच दिवसांत दातांचा पिवळेपणा दूर होतो. शिवाय दातांना कीडही लागत नाही.

हळदी

हळदसुद्धा आपल्या स्वयंपाक घरात सहजपणे आढळणारा पदार्थ आहे. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. त्यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होतो. याशिवाय त्याचा नियमित वापर केल्याने हिरड्यांना सूजसुद्धा येत नाही. ही पेस्ट बनवण्यासाठी एका भांड्यात हळद टाका आणि त्यात थोडेसे पाणी घाला. ही पेस्ट आपल्या दातांवर लावून २ ते ३ मिनिटे तसेच राहू द्या. त्यांनंतर दात स्वच्छ करा. असे नियमित केल्याने अगदी काही दिवसांतच तुमचे दात पांढरे शुभ्र दिसायला लागतील.

 

(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner