हवामानात बदल झाल्यामुळे जगभरात विषाणूसंसर्ग आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 'द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज'मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनानुसार जगात चिकनगुनियाचा धोका वाढतोय. चिकनगुनियाच्या संसर्गातून बरे होऊन तीन महिन्यांनंतरही याचे घातक परिणाम शरीरावर होऊ शकतात, असं ताज्या संशोधनात आढळून आलं आहे.
चिकनगुनिया हा आर्थ्रोपोड-जनित विषाणू (Alphavirus) असून डासांद्वारे पसरतो. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे यामुळे शरीरात तीव्र वेदना होतात आणि सांध्याच्या इतर समस्या उदवतात. चिकनगुनियाचा प्रसार हा एडिस इजिप्ती (Aedes aegypti) आणि एडिस अल्बोपिक्टस (Aedes albopictus) या डासांद्वारे होतो. चिकनगुनियामुळे शरीरात गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका असतो. या गुंतागुंतीमुळे रुग्णाचा (विशेषत: वृद्ध रुग्णाचा) मृत्यू देखील होऊ शकतो. सध्या अमेरिकेत या रोगावर लस विकसित झाली असली तरी संसर्ग रोखण्यावर कोणताही उपचार उपलब्ध नाही.
'लॅन्सेट' पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनानुसार चिकनगुनिया विषाणूची लागण झालेल्या रुग्णाला संसर्गानंतर तीन महिन्यांपर्यंत गुंतागुंतीमुळे मृत्यू होण्याचा धोका असतो. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या संशोधकांनी १०० दशलक्ष ब्राझिलियन कोहोर्टच्या डेटाचा वापर करून चिकनगुनिया संसर्ग झालेल्या सुमारे १ लाख ५० हजार रुग्णांचे विश्लेषण केले होते. या अभ्यासानुसार चिकनगुनिया संसर्ग झाल्यानंतर होणाऱ्या शारीरिक गुंतागुंतांमध्ये हृदयरोग, चयापचय आणि मूत्रपिंडाचा आजार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा आजार होण्याचा धोका निर्माण होतो.
चिकनगुनियाच्या संसर्गानंतर निर्णाण झालेले आरोग्याचे धोके चिंताजनक असतात. ते अजिबात हलक्यात घेऊ नये. चिकनगुनिया संसर्ग झाल्यानंतर संधिवात, न्यूरोलॉजिकल समस्या सारखी गुंतागुंत तीन महिन्यांपर्यंत टिकून राहू शकते. सांधेदुखी, ताप आणि तीव्र डोकेदुखी निर्माण झाल्यास अधिक दक्षता घेणे महत्वाचे असते. यापैकी कोणतीही समस्या उदभवल्यास रुग्णांने विश्रांती घेणे, भरपूर पाणी पिणे आणि योग्य औषधोपचाराद्वारे वेदना व्यवस्थापन करण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
'तुम्ही राहता त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे सर्वप्रथम नष्ट करा. परिसरात डास मारण्यासाठीच्या किटकनाशकांची फवारणी करा. तसेच लांब बाह्याचे शर्ट आणि पँट परिधान करणे आवश्यक असते. याव्यतिरिक्त, हायड्रेटेड राहणे आणि भरपूर विश्रांती घेणे शरीरास संसर्गाविरूद्ध लढण्यास आणि गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
चिकनगुनियाचे निदान झाल्यास लवकरात लवकर उपचार घेऊन औषधोपचार सुरू करावी' अशी माहिती बेंगळुरू येथील नारायण हेल्थ सिटी येथे इंटरनल मेडिसिन विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत डॉ. निधी मोहन यांनी दिली.
वयोवृद्ध रुग्ण, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना चिकनगुनिया झाल्यास धोका अधिक असतो. डेंग्यू आणि इतर साथीच्या तापाच्या तुलनेत चिकनगुनियाची लक्षणे तीव्र असल्याने रुग्णाची तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ काळजी घेणे आवश्यक असते.
चिकनगुनियामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तशी कमी आहे. मात्र तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ चिकनगुनिया रुग्णांवरील अभ्यासाअंती रुग्णामध्ये मृत्यूचा धोका संभवतो, असं दिसून आलं आहे. तरीसुद्धा या क्षेत्रात बऱ्याच अभ्यासाची आवश्यकता असल्याचे डॉ. निधी सांगतात. चिकनगुनिया हा आजार सामान्यत: प्राणघातक नसला तरी त्यामुळे शरीरात विविध प्रकारची गुंतागुंत मात्र निर्माण होऊ शकते, असं डॉ. निधी सांगतात.
संबंधित बातम्या