What Is Prostate Cancer In Marathi: हल्ली ६० वर्षांवरील नाही तर, चाळीशीतील पुरुषांना देखील प्रोस्टेट कर्करोगाचे निदान होत आहे. वेळीच निदान आणि उपचार व व्यवस्थापन केल्यास या कर्करोगावर मात करता येऊ शकते. प्रोस्टेट कर्करोग हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि जगभरातील पुरुषांमध्ये मृत्यूला कारणीभूत ठरणारा सहावा प्रमुख कर्करोग आहे. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झालेल्या पुरुषांची संख्या 2040 पर्यंत दुप्पट होईल असा अंदाज आहे. हा डेटा सूचित करतो की वार्षिक प्रोस्टेट प्रकरणे 2020 मध्ये 1.4 दशलक्ष वरून 2040 मध्ये 2.9 दशलक्ष पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. विकास सांगतात की, भारतात 1,00,00 पुरुषांपैकी नऊ जणांना प्रोस्टेट कर्करोग असून हा आकडा दरवर्षी वाढत चालला आहे. देशात प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. त्याकरिता प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन (पीएसए) ही एक रक्ताची चाचणी केली जाते. यामध्ये पीएसएची पातळी मोजली जाते आणि त्याची प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता लवकर समजण्यास मदत होऊ शकते. डिजिटल रेक्टल परीक्षणाद्वारे (DRE) त्वरीत उपचार सुरु करता येतात.
तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी अंदाजे 33,000 ते 42,000 नवीन प्रकरणाची नोंद होते. याकरिता वेळीच प्रतिबंध करणे आवश्यक असून नियमित तपासणी आणि त्वरीत उपचारांची आवश्यकता आहे. प्रोस्टेट मूत्राशयाच्या अगदी खाली स्थित आहे जे अक्रोडाच्या आकाराचे असून मूत्रमार्गाला जोडलेले आहे. या कर्करोगासाठी जोखीम घटक म्हणजे वय, अनुवांशिकता आणि आहार, अतिरिक्त फॅट्स आणि मांसाहार जास्त असलेला आहार, धूम्रपान आणि लठ्ठपणा हे सर्व प्रोस्टेट कर्करोगाशी निगडीत आहेत. वारंवार लघवी होणे, लघवी व वीर्यावाटे रक्त येणे, लघवी करताना जळजळ होणे ही लक्षणे आहेत. त्यामुळे, प्रोस्टेट कर्करोगासाठी वेळीच तपासणी केल्यास रुग्णाचे परिणाम सुधारण्यास मदत होईल.
प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन (PSA) टेस्ट आणि डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन (DRE) चाचण्या वापरून प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी केली जाते. रक्तातील पातळी तपासण्यासाठी प्रोस्टेट-विशिष्ट प्रतिजन (PSA) चाचणी केली जाते. प्रोस्टेट कर्करोगाची तपासणी ही यूरोलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार करावी. डिजिटल रेक्टल परीक्षा (DRE), ही एक वैद्यकीय चाचणी आहे जी तुमच्या गुदाशय, गुद्द्वार आणि प्रोस्टेट ग्रंथी मधील विकृती शोधण्यात मदत करते. बायोप्सी, ट्रान्स रेक्टल अल्ट्रासाऊंड (TRUS),एमआरआय, हाडांचे स्कॅन आणि पीईटी स्कॅन या इतर महत्त्वाच्या चाचण्या आहेत.
या कर्करोगामध्ये रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमीचा समावेश होतो जो प्रोस्टेट ग्रंथी आणि त्याच्या आसपासच्या ग्रंथी काढून टाकण्यासाठी केला जातो. याशिवाय, रुग्णाला रेडिएशन थेरपी, केमोथेरपी किंवा हार्मोनल थेरपीचा सल्ला दिला जातो. प्रोस्टेट कर्करोगाचा वेळेवर शोध घेणे ही काळाची गरज आहे.तज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित आरोग्य तपासणी आणि फॉलो अप करा. तुम्ही तुमच्या हृदयाची आणि श्वासोच्छवासाच्या आरोग्याची जशी काळजी घेता त्याप्रमाणे आणखी विलंब न करता प्रोस्टेटच्या आरोग्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे.
शिवाय, एखाद्याने निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि धूम्रपान आणि मद्यपानाची व्यसन सोडणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला पाहिजे. PSA आणि DRE या चाचण्या वर्षातून एकदा कराव्यात तसेच पन्नाशीनंतर तसेच कौटुंबिक इतिहास असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच तपासणी करावी. मूत्रमार्गासंबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष न करता यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करा.