Milk Drinking Benefits: भारतीय आहारात दूध फार महत्त्वाचे आहे. दुधाला विशेष स्थान आहे. मोठे असो वा लहान मुलं, प्रत्येकाने दररोज एक ग्लास दूध पिणे गरजेचे आहे. विशेषत: लहान मुलांच्या चांगल्या वाढीसाठी दूध पाजले जाते. प्रौढांनीही त्यांच्या हाडांच्या बळकटीसाठी दूध आवर्जून प्यावे. अनेक प्रकारचे फ्लेवर्स दुधात मिसळून तुम्ही सेवन करू शकता. अनेकांना दूध सकाळी प्यायला आवडते, तर काहीजण झोपायच्या आधी. पण, दूध पिण्याची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आपण आज जाणून घेऊयात.
आयुर्वेदानुसार, मोठ्यांसाठी रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ आहे. तर मुलांनी सकाळीच दूध प्यावे. रात्री दूध प्यायल्याने त्यांना त्रास होऊ शकतो. दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. याशिवाय, झोपताना ऍक्टिव्हिटीची पातळी कमी असते त्यामुळे शरीर दुधामधून जास्तीत जास्त कॅल्शियम शोषून घेते.
तुम्ही दिवसभरात आरामात २ ते ३ कप दूध पिऊ शकता, परंतु लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असू शकतो. जर तुम्ही फुल क्रीम दूध पीत असाल तर एक किंवा दोन कपपेक्षा जास्त पिऊ नका, अन्यथा वजन वाढू शकते.
अनेकदा फ्रुट मिल्कशेक बनवले जातात. पण आयुर्वेदात फळे दुधात मिसळून पिण्याचा सल्ला दिला जात नाही. दूध पिण्याची योग्य पद्धत कोणती, असा प्रश्न अनेकांना पडतो. दूध थंड असो वा गरम, दोन्ही प्रकारे शरीरासाठी फायदेशीर असतात, पण तुम्ही कोणत्या वेळी दूध पिटाई याचाही फरक पडतो. जर तुम्ही दिवसा दूध पीत असाल तर तुम्ही ते थंड किंवा गरम पिऊ शकता. याउलट, जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ते पीत असाल तर फक्त कोमट किंवा गरम दूध प्या. रात्रीच्या वेळी थंड दुधामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)