Brain Eating Amoeba : केरळमधील खासगी रुग्णालयात प्राथमिक अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसवर उपचार घेणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाचा ४ जुलै रोजी रात्री मृत्यू झाला. नेग्लेरिया फाउलरी नावाच्या जंतूसंसर्गामुळं हा आजार होतो. या जंतूला ‘मेंदू खाणारा अमिबा’ असंही म्हणतात. या अमिबामुळं केरळमध्ये दोन महिन्यांत तिसरा मृत्यू झाल्यामुळं चिंता वाढली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत्यू झालेला मुलगा काही दिवस आधी एका छोट्या तलावात पोहला होता. तिथंच त्याला या आजाराचा संसर्ग झाला. आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लगेचच प्रतिबंधात्मक उपाय केले. मात्र, त्याचा जीव वाचू शकला नाही.
हा आजार नेमका काय आहे? तो कसा होतो आणि त्याची लक्षणे कोणती आहेत? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
कोमट गोड्या पाण्यात आणि मातीमध्ये राहणाऱ्या 'नेग्लेरिया फाउलरी' या एकपेशीय जीवामुळे प्राथमिक अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (पीएएम) हा आजार होतो. हा जिवाणू नाकावाटे शरीरात जातो आणि लोकांना बाधित करतो. विशेषत: पाण्यात पोहताना तो नाकात जाण्याची शक्यता जास्त असते. आत गेल्यावर हा जिवाणू मेंदूच्या दिशेनं सरकतो. त्यामुळं आरोग्याला गंभीर नुकसान होते आणि अंगभर जळजळ होते.
हा अमीबा ४६ अंश सेल्सिअस तापमानात वाढतो आणि तलाव, नद्या, व्यवस्थित देखभाल न केलेले जलतरण तलाव, स्प्लॅश पॅड, सर्फ पार्क आणि मौजमजेसाठी साठवलेल्या गोड्या पाण्यात आढळू शकतो.
‘ब्रेन इटिंग अमिबा’ पोहण्यासारखे व्यायाम करत असताना नाकातून आत प्रवेश करून व्यक्तींना संक्रमित करतो. शरीरात गेल्यावर तो मेंदूपर्यंत जातो आणि मेंदूच्या ऊतींना नष्ट करतो. त्यामुळं मेंदूला सूज येते आणि पुढं ते जिवावर बेततं.
डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या ही या आजाराची प्राथमिक लक्षणं आहेत. जसजसा संसर्ग वाढत जातो, तसतशी मानेला आकडी येणे, फेफरे, भ्रम असे त्रास होतात आणि शेवटी रुग्ण कोमात जातो.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, प्राथमिक अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस असलेले बहुतेक लोक लक्षणे दिसू लागल्यानंतर १ ते १८ दिवसांच्या आत मरतात. साधारणपणे पाच दिवसांनंतर रुग्ण कोमात जाऊन नंतर त्याचा मृत्यू होतो.
आज तरी प्राथमिक अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीससाठी कोणतेही निश्चित उपचार नाहीत. डॉक्टर ॲम्फोटेरिसिन बी, ॲझिथ्रोमाइसिन, फ्लुकोनाझोल, रिफाम्पिन, मिल्टेफोसिन आणि डेक्सामेथासोन या औषधांच्या मिश्रणाचा वापर करतात, परंतु हे उपचार फारसे प्रभावी ठरलेले नाहीत.