मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heart Valve Disease: काय असतो हृदयाच्या झडपा आजार? जाणून घ्या कारणे आणि प्रकार!

Heart Valve Disease: काय असतो हृदयाच्या झडपा आजार? जाणून घ्या कारणे आणि प्रकार!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 21, 2024 11:30 PM IST

National heart valve disease awareness day 2024: राष्ट्रीय हृदय झडप रोग जागरूकता दिवस दरवर्षी २२ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

Valvular Heart Disease: Causes, symptoms, diagnosis and treatment
Valvular Heart Disease: Causes, symptoms, diagnosis and treatment (Pixabay )

Heart Health Care: हृदयाच्या आत असणाऱ्या झडपेमध्ये काही बिघाड झाल्यास रक्ताच्या सामान्य प्रवाहात अडथळे निर्माण होतात. हृदयात एकूण चार झडपा असतात - एओर्टिक, मिट्रल, ट्रायक्यूस्पिड आणि पल्मनरी. या झडपा सतत उघडझाप करून रक्ताचा प्रवाह योग्य दिशेला जाईल हे सुनिश्चित करत असतात. या झडपांचे जेव्हा नुकसान होते किंवा त्यामध्ये काही बिघाड होतो, तेव्हा होणाऱ्या हृदयाच्या झडपेच्या आजाराचा परिणाम रक्त पंप करण्याच्या हृदयाच्या क्षमतेवर होतो. याबद्दल कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथील कन्सल्टन्ट, ऍडल्ट कार्डियाक सर्जरी, सीव्हीटीएस, डॉ मनीष हिंदुजा यांच्याकडून जाणून घेऊयात.

लक्षणे

हृदयाच्या झडपांच्या आजाराची लक्षणे त्याच्या गांभीर्यावर तसेच कोणत्या झडपेला आजार झाला आहे त्यावर अवलंबून असतात. थकवा येणे, श्वास नीट न घेता येणे, छातीत दुखणे, हृदयाचे ठोके अनियमित पडणे तसेच घोटा, पाऊल किंवा पोटामध्ये सूज अशी लक्षणे दिसून येतात.

का होतो आजार?

हृदयाच्या झडपांचा आजार सर्वसामान्यतः वय झाल्यामुळे, ऱ्हुमॅटिक तापामुळे, हृदयाच्या झडपांना संसर्ग झाल्यामुळे होतो, तसेच हा आजार जन्मजात देखील असू शकतो. हायपरटेन्शन आणि हार्ट अटॅक यामुळे देखील झडपेचे नुकसान होऊ शकते.

स्टेनोसिस आणि रिगर्गीटेशन हे हृदयाच्या झडपेच्या आजाराचे दोन प्रमुख प्रकार आहेत. स्टेनोसिसमध्ये झडप अरुंद होते, त्यामुळे त्यामधून रक्त वाहणे कठीण होऊन बसते. रिगर्गीटेशन म्हणजे झडप नीट बंद होत नाही, त्यामुळे रक्त पाठीमागे गळते. हे दोन्ही प्रकारचे आजार चारपैकी कोणत्याही झडपेला होऊ शकतात आणि त्यामुळे अनेक वेगवेगळी लक्षणे व गुंतागुंत होऊ शकते.

या आजारावर उपचार न केल्यास, गंभीर गुंतागुंत होऊ शकते. सर्वात जास्त प्रमाणात होणारी गुंतागुंत म्हणजे हृदय निकामी होणे, शरीराला जितकी गरज असते तितक्या प्रमाणात रक्त पंप केले जाऊ शकत नाही. रक्तामध्ये गुठळ्या देखील होऊ शकतात, त्यामुळे स्ट्रोक किंवा इतर व्हस्क्युलर गुंतागुंत देखील होऊ शकते. झडपेच्या आजारामुळे हृदयाचे कप्पे प्रसारण पावतात, त्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात.

हृदयाच्या झडपेच्या आजाराचे निदान करण्यासाठी रुग्णाची संपूर्ण वैद्यकीय पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागते, त्याबरोबरीनेच शारीरिक तपासणी आणि डायग्नोस्टिक तपासण्या करून घ्याव्या लागतात. झडपेचा आजार किती गंभीर आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर इकोकार्डिओग्राम, इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी), छातीचे एक्सरे किंवा कार्डियाक कॅथेटेरायझेशन यांचा उपयोग करून त्यानुसार सर्वात योग्य उपचार दृष्टिकोन ठरवू शकतात.

हृदयाच्या झडपेच्या आजारावरील उपचार आजाराच्या गांभीर्यावर आणि कोणत्या झडपेला आजार झाला आहे यावर अवलंबून असतात. डाययुरेटिक्स किंवा रक्त पातळ करणारी औषधे देऊन लक्षणे दूर केली जाऊ शकतात तसेच गुंतागुंत होणे टाळले जाऊ शकते. केस खूप जास्त गंभीर असेल तर हृदयाचे कार्य पुन्हा सुरळीतपणे व्हावे यासाठी झडपेची दुरुस्ती किंवा झडप बदलण्यासाठी सर्जरी करावी लागू शकते. सर्जरीनंतर रुग्णाची तब्येत पूर्णपणे पूर्वीसारखी होण्यासाठी एक ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

हृदयाच्या झडपेचा आजार ही एक गंभीर स्थिती आहे, याचे निदान लवकरात लवकर झाले पाहिजे तसेच उपचार देखील तातडीने केले गेले पाहिजेत. या आजाराची लक्षणे, कारणे, प्रकार, धोके आणि गुंतागुंत याविषयी समजून घेतल्यास आजार टाळता येणे तसेच आजार झाल्यास त्यावर लवकरात लवकर उपचार करवून घेणे शक्य होते. कार्डिओव्हस्क्युलर तपासण्या नियमितपणे करून घेणे, जीवनशैली निरोगी ठेवणे यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखले जाऊ शकते आणि हृदयाच्या झडपेचा आजार होण्याचा धोका देखील कमी होतो. लक्षणे किंवा धोके जाणवल्यास, तातडीने पूर्णकालीन तज्ज्ञ सेवा जिथे उपलब्ध आहेत अशा डॉक्टरांशी संपर्क साधून व्यक्तिगत उपचार व देखभाल योजना करून घ्यावी.

विभाग