Health Tips: क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया म्हणजे काय? जाणून घ्या कसा होतो भावनिक परिणाम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया म्हणजे काय? जाणून घ्या कसा होतो भावनिक परिणाम

Health Tips: क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया म्हणजे काय? जाणून घ्या कसा होतो भावनिक परिणाम

May 13, 2024 11:05 PM IST

Health Care Tips: कर्करोगाचे निदान हे सुरुवातीला घाबरवून टाकणारे असले तरीही योग्य पद्धत वापरल्यास क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियाचे व्यवस्थापन शक्य आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे.

क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया म्हणजे काय
क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया म्हणजे काय (freepik)

Chronic Myeloid Leukemia: क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया (CML) हे केवळ एक निदान नसून तो एक आयुष्यभर चालणारा प्रवास आहे, ज्यात सक्रीय व्यवस्थापन आणि भावनिक चिकाटी गरजेची आहे. ल्युकेमियाच्या एकूण प्रकरणांपैकी केवळ १५ टक्‍के प्रमाण असलेल्या सीएमएल आजारामध्ये बोन मॅरोवर परिणाम होतो , ज्यातून पांढऱ्या पेशींची अनिर्बंध वाढ होऊ लागते. कर्करोगाचे निदान हे सुरुवातीला घाबरवून टाकणारे असले तरीही योग्य पद्धत वापरल्यास सीएमएलचे व्यवस्थापन शक्य आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे.

अनेक रुग्ण आहेत, जे सीएमएलमुळे तीव्र भावनिक उद्वेगातून जात असतात. मात्र जिथे हा आजार नियंत्रणात आणणे अधिक शक्य असते अशा क्रॉनिक टप्प्याचे निदान झालेल्या रुग्णांना आव्हाने असूनही एक परिपूर्ण आयुष्य जगता येऊ शकते. सीएमएलचे व्यवस्थापन करताना त्यात सक्रीयतेने सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण क्रॉनिक टप्प्यातील सीएमएल वर वेळीच उपचार न झाल्यास तो वेगाने बळावू शकतो. आपल्या उपचारांच्या परिणामकारकतेची खातरजमा करण्यासाठी आणि आजार अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचण्यास प्रतिबंध करण्यासाठी तुमच्या BCR-ABL पातळ्यांवर नियमितपणे देखरेख ठेवणे आणि उपचारांच्या इप्सित लक्ष्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे, असे मुंबई येथील एम्पायर सेंटर हेमॅटोलॉजी अँड ऑन्कोलॉजी स्पेशलिटी क्लिनिकचे एम.डी., एफआरसीपीए डॉ. अभय भावे यांनी सांगितले.

कसे करावे व्यवस्थापन

बहुतेकदा सीएमएलला ‘गुड कॅन्सर’ – चांगला कॅन्सर म्हटले जाते. कारण तो हाताळता येण्याजोगा आहे. तरीही सीएमएल अधिकाधिक गंभीर होत गेला की मात्र तो चांगला रहात नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही रुग्ण औषधांना प्रतिसाद देईनासे होतात किंवा त्यांना असे काही दुष्परिणाम दिसून येतात, ज्यांचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होऊ लागतो. असे असले तरीही, वेळीच केलेला हस्तक्षेप आणि काळजीपूर्वक ठेवलेली देखरेख यामुळे ही आव्हाने टाळण्यास किंवा त्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच, आपल्याला आरोग्यसेवा पुरविणाऱ्यांशी प्रभावी संवाद साधल्याने या आजाराचे इष्टतम व्यवस्थापन खात्रीने होऊ शकते. त्यामुळे उपचारांचा हा प्रवास करताना रुग्णाच्या मनामध्ये आशा आणि आत्मविश्वासाची भावना रुजते.

सीएमएलचे भावनिक पैलू

वैद्यकीय पैलूंबरोबरच सीएमएलच्या भावनिक परिणामाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. सीएमएलच्या रुग्णांना प्रारंभिक टप्प्यावर सामोऱ्या येणाऱ्या काही आव्हानांपैकी एक आव्हान म्हणजे सामाजिक स्तरावर कर्करोगाशी जोडलेली शरमेची भावना. समाजाच्या या आजाराकडे पाहण्याच्या नजरेमुळे अनेकांना आपल्या कुटुंबियांखेरीज इतर कुणाशीही या आजाराच्या निदानाविषयी उघडपणे बोलण्यास संकोच वाटतो. आणि इथेच कुटुंबाचा भक्कम पाठिंबा आणि भावनिक चिकाटी या गोष्टी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रियजनांशी मनमोकळा संवाद साधणे आणि गरज वाटेल तेव्हा मानसिक स्वास्थ्यासाठी आधार शोधणे हे सीएमएलच्या सर्वांगीण व्यवस्थापनाचे अत्यावश्यक घटक आहेत.

लक्षात ठेवा या गोष्टी

सातत्यपूर्ण देखरेख - उपचारांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यासाठी आणि काही बदल झाल्यास ते लगेच ओळखण्यासाठी तुमच्या BCR-ABL पातळीचा सातत्याने मागोवा घ्या. वेळच्यावेळी हस्तक्षेपासाठी आणि आजार बळावण्यास प्रतिबंध करण्यासाठी नियमित देखरेख अत्यंत महत्त्वाची आहे.

सर्वांगीण दृष्टिकोन - मानसिक स्वास्थ्यासाठी आधार, आहारातील तडजोडी आणि नियमित व्यायाम या गोष्टींचा तुमच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये समावेश करत उपचारांमध्ये एक सर्वांगीण दृष्टिकोन जपा. या सर्वांगीण दृष्टिकोनामुळे तुमच्या एकूण स्वास्थ्याला बळकटी मिळेल आणि सीएमएल व्यवस्थापनालाही आधार मिळेल.

मनमोकळा संवाद - आपले डॉक्टर आणि काळजीवाहू व्यक्ती यांच्याशी आपणहून खुला आणि प्रामाणिक संवाद साधा. कोणत्याही प्रकारच्या चिंता, लक्षणे किंवा सीएमएल सोबतच्या वाटचालीत तुम्हाला सामोरी येणारी कोणतीही आव्हाने याविषयी बोलते व्हा, जेणेकरून तुम्हाला परिणामकारक मदत आणि व्यवस्थापनाची हमी मिळेल.

आधारासाठीचे नेटवर्क्स - आपला अनुभव इतरांना सांगण्यासाठी, भावनिक आधार मिळविण्यासाठी आणि आपल्या प्रवासात कमी एकटेपणा जाणवावा यासाठी आधारगटांच्या माध्यमातून इतर सीएमएल रुग्णांशी स्वत:ला जोडून घ्या.

लक्षात ठेवा, आपल्या उपचारांमध्ये तुमचा सक्रीय सहभाग आणि भावनिक स्वास्थ्य या दोन गोष्टींचा तब्येतीवर अधिक चांगले परिणाम घडवून आणण्याच्या दृष्टीने व जीवनमानाचा दर्जा चांगला राखण्यातील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner