What Is Heart Failure : तुमचं हृदय शरीरातील इतर अवयवांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा करण्याचं कार्य योग्य पद्धतीने करू शकत नसेल, तर त्या स्थितीला हार्ट फेल्युअर असे म्हणतात . हृदय हा तुमच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे जो विविध शारीरिक कार्यासाठी जबाबदार आहे. हार्ट फेल्युअर ही एक गंभीर स्थिती असून ती प्राणघातक ठरू शकते. ही अशी स्थिती आहे जेव्हा तुमचे हृदय तुमच्या शरीराच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे रक्त पंप करू शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की तुमच्या हृदय काम करणे थांबले आहे. हार्ट फेल्युअर म्हणजे तुमचे हृदय काम करत आहे परंतु ते व्याप्तीने करायला हवे तसे काम करत नाही. ही विशिष्ट स्थिती हळूहळू विकसित होऊ शकते. उपचार न केल्यास किंवा दुर्लक्ष केले तर त्यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकतात ज्या जीवघेण्या ठरतात. हार्ट फेल्युअर वयाची पर्वा न करता कोणालाही प्रभावित करू शकते, असे कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे सांगतात.
परंतु प्रौढांमध्ये, विशेषतः ज्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा पूर्वीचा इतिहास आहे त्यांच्यामध्ये हे अधिक सामान्य आहे. जेव्हा तुमचे हृदय कार्यक्षमतेने रक्त पंप करत नाही तेव्हा तुमच्या शरीरातील अवयव आणि ऊतींना पुरेसे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि सूज येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. या स्थितीचे लवकर निदान केल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि प्रभावी उपचार करता येतात.
हृदयविकाराशी संबंधित अनेक लक्षणे दिसू शकतात. यामध्ये दम लागणे (विशेषतः जेव्हा तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करता किंवा शारीरिक हालचाली करतात), थकवा, पाय, घोटे किंवा पोटाच्या भागात सूज येणे, अनियमित हृदयाचे ठोके, सतत खोकला किंवा छातीत घरघर होणे, व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे, अचानक वजन वाढणे, पुरेसा वेळ विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवणे, भूक न लागणे, गोंधळ उडणे, छातीत दुखणे, त्वचा किंवा ओठ निळसर पडणे (सायनोसिस) आणि झोप न लागणे यासारख्या लक्षणांचा समावेश असू शकतो. ही लक्षणे व्यक्तीपरत्वे बदलू शकतात. वेळेवर उपचार किंवा निदान न केल्यास, कालांतराने ही लक्षणे आणखी गंभीर होऊ शकतात.
प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची, विशेषतः हृदयाच्या आरोग्याची अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केल्याने हृदयविकाराच्या समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी आणि मधुमेह यासारख्या सामान्य जोखीम घटकांचे व्यवस्थापन करावे. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि संतुलित तसेच निरोगी आहाराचे सेवन करा. तुमच्या हृदयावरील ताण कमी करण्यासाठी तुमच्या आहारात मीठ, सॅचुरेटेड फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल पातळी कमी ठेवा. नियमित व्यायाम करून शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने तुमचे हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकते आणि रक्ताभिसरण देखील सुधारू शकते. जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मधुमेहासारख्या काही समस्यांचे निदान झाले असेल तर त्यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. नियमित तपासणी ही हृदयविकाराच्या कोणत्याही असामान्य लक्षणे ओळखण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला अस्वस्थ वाटू लागले किंवा कोणत्याही प्रकारचे हृदयविकाराची समस्या जाणवू लागले तर ताबडतोब वैद्यकिय सल्ला घ्या.
संबंधित बातम्या