Cancer Care: महिलांमध्ये सामान्यपणे कोणते कर्करोग होतात? जाणून घ्या सविस्तर!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cancer Care: महिलांमध्ये सामान्यपणे कोणते कर्करोग होतात? जाणून घ्या सविस्तर!

Cancer Care: महिलांमध्ये सामान्यपणे कोणते कर्करोग होतात? जाणून घ्या सविस्तर!

Feb 08, 2024 11:52 PM IST

Women Health: महिलांमध्ये होणाऱ्या मुख्य कर्करोगाची कारणे आणि लक्षणे याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊयात.

What Cancers Are Common in Women
What Cancers Are Common in Women (Pixabay)

Health Care: कर्करोग हा जीवघेणा आजार आहे. योग्य वेळी ओळखून योग्य पद्धतीने उपचार केला तर कर्करोगामुळे होणारे मृत्यू आपण कमी करु शकतो. कर्करोगाला अनेक महिलाही बळी पडतात. महिलांमध्ये होणारे मुख्य कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (cervical cancer), अंडाशयाचा कर्करोग, तोंडाचा (मुखाचा) कर्करोग, आणि आतड्याचा कर्करोग (colorectal cancer). महिलांना कर्करोगापासून वाचविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न केले जातात. तरीही हा आजार तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत आढळतो. ह्याच मुख्य कारण म्हणजे ह्या आजाराबद्दलची अजाणता. तर आपण महिलांमध्ये होणाऱ्या मुख्य कर्करोगाची कारणे आणि लक्षणे याबद्दल पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, माहीम, मुंबई येथील, कॅन्सल्टंट गायनेकॉलॉजिकल कर्करोग आणि रोबोटिक सर्जन, डॉ संपदा देसाई यांच्याकडून...

स्तनाचा कर्करोग

महिलामध्ये सर्वाधिक प्रमाणात हा कर्करोग होतो. महिलामध्ये होणाऱ्या सर्व कर्करोगमधील २५-२६ टक्के कर्करोग हे स्तनाचे कर्करोग असतात. हा कर्करोग ४५-५० वयाच्या दरम्यान सर्वाधिक प्रमाणात आढळतो. कदाचित आपल्या बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे हा कर्करोग आपल्या देशातही वाढताना दिसून येतोय. स्तनामध्ये गाठ जाणवणे, कडकपणा किंवा गोळा जाणवणे, स्तनामधुन स्त्राव, रक्त किंवा पू येणे, स्तनाच्या ठिकाणी सुज येणे किंवा लालसर होणे, न थांबणारी खाज येणे ही काही स्तनाच्या कर्करोगची लक्षणे असू शकतात.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (cervical cancer)

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये होणारा दुसरा सर्वात गंभीर कर्करोग आहे. वयाच्या ३५व्या वर्षानंतर हया कर्करोगचा धोका वाढतो. हा कर्करोग HPV नावाच्या विषाणूच्या ससंर्गामुळे होत असतो. अंगावरती अधिक प्रमाणात सफेद पाणी जाणे, दोन मासिकपाळीच्यामध्ये रक्तस्त्राव होणे किंवा लाल डाग लागणे, संबंध ठेवल्यानंतर रक्ताचे डाग लागणे किंवा मासिकपाळी बंद झाल्यानंतर स्क्तस्त्राव होणे (postmenopausal bleeding), ओटीपोटीत दुखणे, कमरेत दुखणे ही काही गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची लक्षणे असू शकतात. पॅप स्मियर (Pap Smear) नावाची एक छोटासा तपास करून आपण हा कर्करोग लक्षणे यायच्या पुर्वीच किंवा precancerous stage मधेच जाणू शकतो.

अंडाशयाचा कर्करोग

महिलेच्या अंड (बीजांड) उत्पादन करणा-या अवयवांमध्ये होणाऱ्या कर्करोगला अंडाशयाचा कर्करोग म्हणतात. हा कॅन्सर जास्तप्रमाणात ५०शीच्या वयाच्या दरम्यान होतो पण तो कमी वयोगटात पण आढळतो. महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये हा सर्वात धोकादायक कर्करोग आहे. सुरवातीच्या अवस्थेमध्ये शोध घेणे कठीण असते. ह्या कर्करोगची काही सामान्य लक्षणे असतात ती पुढील प्रमाणे: मासिक पाळीत अनियमता, छातीत जळजळ, पाठ आणि आटीपोटात दुखणे, भुख न लागणे, पोटात मळमळ होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, थकवा जाणवणे. ही लक्षणे जरी दोन आठड्याच्या पेक्षा जास्त वेळ असतील किंवा परत परत जाणवत असतील तर डॉक्टरकडे जाऊन त्यांची तपासणी करणे गरजेच असत.

तोंडाचा (मुखाचा) कर्करोग

मुखाचा कर्करोग हा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होतो. तोंडाची अस्वच्छता, जिभेला किंवा गालाला सतत घासणारा दात, योग्यपद्धतीने न बसलेली कवळी, तोंडाचे संसर्ग जसे कि HPV ह्या काही कारणामुळेही हा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. दिर्घकाळ टिकलेली (न भरणारी) जखम (ulcer), वाढलेली गाठ, तोंड व्यवस्थित न उघडणे, जीभ बाहेर न येणे, ही काही ह्या कर्करोग लक्षणे असू शकतात.

आतड्याचा कर्करोग (colorectal cancer)

मोठ्या आतड्याचा कर्करोग आणि गुद्धशयाचा कर्करोग पण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. हा कर्करोग होण्यामागची महत्वाची कारणे म्हणजे कमी प्रमाणात हाय फायबर डाएट घेणे, जास्त प्रमाणात प्रोसेड अन्न खाणे, स्थूलपणा, तंबाखुच सेवन करणे या असते. ह्या कर्करोगची मुख्य लक्षणे म्हणजे पोट साफ न होणे, संडासाच्या मार्गे रक्त जाणे, संडास काळ्या रंगाचा होणे, भुख न लागणे.

कर्करोगच प्रमाण जरी वाढत असल तरीही प्राथमिक अवस्थेत आढळलेले नव्वद टक्के कर्करोग पूर्णपणे ठिक होऊ शकतात. गरज आहे ती सर्ततकेची. आपण जर जागरूक राहिलो आणि कर्करोगची कोणतेही लक्षण दिसताच योग्य डॉक्टरकडे जाऊन निदान केल, आपली जीवनशैली बदलून चांगल्या सवयी ठेवल्या, तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहिलो तर हे कर्करोग आटोक्यात आणण्यात मदत होईल.

Whats_app_banner