PCOS: स्त्रियांमध्ये पीसीओएसची लक्षणे कोणती असतात? जाणून घ्या!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  PCOS: स्त्रियांमध्ये पीसीओएसची लक्षणे कोणती असतात? जाणून घ्या!

PCOS: स्त्रियांमध्ये पीसीओएसची लक्षणे कोणती असतात? जाणून घ्या!

Jan 30, 2024 10:39 PM IST

Symptoms of PCOS: काही महिलांना पीसीओएसची समस्या होते. याची लक्षणं काय आहेत आणि हे ओळखण्यासाठी कोणत्या टेस्ट करणे गरजेचे आहे हे जाणून घ्या.

pcos symptoms and treatment
pcos symptoms and treatment (freepik)

Women Health: पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा एक सामान्य हार्मोनल विकार आहे, जो प्रजननक्षम वयातील स्त्रियांना होऊ शकतो, ज्यामध्ये लैंगिक हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होते. या स्थितीचा स्त्रीची पुनरुत्पादकता, चयापचय आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. पीसीओएची चिन्हे आणि लक्षणे ओळखणे, योग्य निदान चाचण्या करून, त्यावर ताबडतोब कृती करणे या आजाराच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण आहे. याबद्दल न्यूबर्ग येथील अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊयात.

लक्षणे

मासिक पाळीची अनियमितता

 पीसीओएस असलेल्या महिलांना अनेकदा अनियमित मासिक पाळी येते. तसेच काही वेळा मासिक पाळी दीर्घकाळ न येणे किंवा मासिक पाळी थांबणे अशी लक्षणेही दिसून येऊ शकतात.

ओव्हुलेटरी डिसफंक्शन

पीसीओएस सामान्य बीजकोष फुटून स्त्री जनन पेशी बाहेर येण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे प्रजनन समस्या उद्भवू शकतात. पीसीओएस असणा-या महिलांना अनियमित ओव्हुलेशन किंवा ओव्हुलेशन न होणे यामुळे गर्भधारणा होणे आव्हानात्मक होऊ शकते.

हायपरअँड्रोजेनिझम

पीसीओएस असलेल्या स्त्रियांमध्ये एंड्रोजेन या पुरुष हार्मोन्सची उच्च पातळी आढळून येणे सामान्य आहे. यामुळे हर्सुटिझम (केसांची जास्त वाढ), पुरळ आणि पुरुषांप्रमाणे टक्कल पडणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

पॉलीसिस्टिक अंडाशय

पीसीओएस असलेल्या सर्व महिलांना गर्भाशयातील ग्रंथींवर गळू नसतात. तथापि, अल्ट्रासाऊंडद्वारे आढळलेल्या अंडाशयांवर अनेक लहान गळू आढळून येणे हे एक सामान्यपणे आढळून येणारे वैशिष्ट्य आहे.

इंसुलिन रेझिस्टन्स

पीसीओएस असलेल्या अनेक स्त्रियांमध्ये इन्सुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे येताना आढळून येतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.

निदान चाचण्या

वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी: सर्वसमावेशक वैद्यकीय इतिहास जाणून घेणे आणि शारीरिक तपासणी ही पीसीओएसचे निदान करण्यासाठी पहिली पायरी आहे. आरोग्यसेवा देणारी व्यक्ती तुमच्या मासिक पाळीच्या इतिहासाबद्दल, लक्षणांबद्दल चौकशी करेल आणि हर्सुटिझम आणि मुरुमांसारख्या लक्षणांचे मूल्यांकन करण्यासाठी शारीरिक तपासणी करेल.

रक्त चाचण्या

हार्मोनल रक्त चाचण्यांमध्ये टेस्टोस्टेरॉन, ल्युटेनिझिंग हार्मोन (एलएच), फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (एफएसएच) आणि इन्सुलिनसह विविध हार्मोन्सची पातळी मोजतात. टेस्टोस्टेरॉनची उच्च पातळी आणि उच्च एलएच-टू-एफएसएच गुणोत्तर हे पीसीओएसचे सामान्य निर्देशक आहेत..

अल्ट्रासाऊंड

पेल्विक अल्ट्रासाऊंड अनेकदा अंडाशयांची तपासणी करण्यासाठी केले जाते. अंडाशयांवर अनेक लहान गळूंची असणे, ज्याला फॉलिकल्स म्हणून ओळखले जाते, हा पीसीओएस आहे हे ठरवण्यासाठीचा मुख्य निकष आहे.

ग्लुकोज टॉलरन्स चाचणी (जीटीटी)

पीसीओएस आणि इंसुलिन प्रतिरोधक यांच्यातील संबंध लक्षात घेता, शरीर ग्लुकोजवर प्रक्रिया कशी करते याचे मूल्यांकन करण्यासाठी जीटीटी केली जाऊ शकते. रक्तातील साखरेची वाढलेली पातळी इंसुलिन प्रतिरोधकता दर्शवू शकते.

एंड्रोजन पातळी

 रक्त चाचण्यांद्वारे एंड्रोजन पातळीचे मूल्यांकन केल्याने हायपरअँड्रोजेनिझम असण्याची पुष्टी करता येते आणि त्यामुळे पीसीओएसचे निदान करण्यात मदत होते.

पीसीओएसचे निदान लवकर होणे आणि त्याचे व्यवस्थापन त्यामुळे आरोग्यावर होऊ शकणाऱ्या संभाव्य दीर्घकालीन परिणामांवर मात करण्यासाठी आवश्यक आहे. अनेकदा वैयक्तिक गरजांनुसार स्त्रीरोगतज्ञ, एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि पोषणतज्ञांचा समावेश असलेल्या सर्वसामावेशक उपचार योजना करण्याची शिफारस केली जाते. पीसीओएसचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्यामुळे प्रभावित झालेल्या महिलांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी जीवनशैलीत बदल, हार्मोनल थेरपी आणि प्रजनन उपचार हे पर्याय आहेत. या सामान्य हार्मोनल डिसऑर्डरचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी नियमित देखरेख आणि सक्रिय आरोग्य सेवा महत्त्वपूर्ण आहेत.

 

Whats_app_banner