Common symptoms and tests of thyroid: थायरॉईड ही एक मानेच्या तळाशी असलेली फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असून, ती विविध शारीरिक कार्यांचे नियमन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. थायरॉईड ही आपले चयापचय, ऊर्जा पातळी आणि शरीराचे तापमान नियंत्रित करणारे संप्रेरक तयार करण्यासाठी जबाबदार असणारी, जणू काही आपल्या शरीरूपी ऑर्केस्ट्राचे संयोजन करणारी एक मूक संयोजक आहे. तथापि, जेव्हा हे नाजूक संतुलन विस्कळीत होते, तेव्हा यामुळे अनेक लक्षणे उद्भवू शकतात ज्यावर उपचार न केल्यास, संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याबद्दल न्यूबर्ग येथील अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांच्याकडून जाणून घेऊयात..
थकवा: सतत आणि विनाकारण येणारा थकवा हे थायरॉईडच्या अनियमित कामकाजाचे वैशिष्ट्य आहे. थायरॉईड संप्रेरके, T3 आणि T4, ऊर्जा निर्मितीसाठी जबाबदार आहेत आणि त्यामधील असंतुलनामुळे सतत थकवा जाणवू शकतो.
वजनातील बदल: विनाकारण वजन वाढणे किंवा कमी होणे हे थायरॉईडच्या समस्यांचे सूचक असू शकते. हायपोथायरॉईडीझम (अंडरएक्टिव्ह थायरॉईड) अनेकदा वजन वाढवते, तर हायपरथायरॉईडीझम (ओव्हरएक्टिव्ह थायरॉइड) वजन कमी करू शकते.
मूड स्विंग्स: थायरॉईड हार्मोन्स मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरवर प्रभाव पाडतात. परिणामी, असंतुलन मूड स्विंग, चिंता आणि नैराश्य या गोष्टींवर परिणाम करू शकते.
केस आणि त्वचेत बदल: कोरडी त्वचा, ठिसूळ नखे आणि केस गळणे हे थायरॉईडच्या अनियमित कामकाजामुळे झालेले असू शकते. केस आणि त्वचेच्या पोत आणि स्वरूपातील बदल ही सामान्य लक्षणे आहेत.
अनियमित मासिक पाळी: थायरॉईड विकार मासिक पाळीवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे अनियमितता, जास्त किंवा कमी कालावधी किंवा अमेनोरिया (मासिक पाळी न येणे) होऊ शकते.
सर्दी किंवा उष्णता सहन न होणे: थायरॉईड संप्रेरके शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतात. हायपोथायरॉईडीझम असलेल्या व्यक्तींना जास्त थंडी जाणवू शकते, तर हायपरथायरॉईडीझम असलेल्यांना उष्णतेची वाढलेली संवेदनशीलता जाणवू शकते.
स्नायू आणि सांधेदुखी: थायरॉईडचे कार्य बिघडल्याने स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि सांधेदुखी होऊ शकते. त्या व्यक्तींना त्यांच्या शरीराच्या विविध भागात कडकपणा आणि अस्वस्थता जाणवू शकते.
TSH (थायरॉईड उत्तेजक संप्रेरक): ही रक्त चाचणी TSH चे स्तर मोजते, जे थायरॉईड उत्तेजित करण्यासाठी पिट्यूटरी ग्रंथीद्वारे तयार केले जाते. एलिव्हेटेड टीएसएच हे थायरॉईड कमी सक्रिय झाल्याचे सूचित करते, तर कमी पातळी थायरॉईड अधिक सक्रिय झाल्याचे सूचित करते.
मुक्त T3 आणि मुक्त T4: या चाचण्या रक्तातील सक्रिय थायरॉईड संप्रेरकांचे स्तर मोजतात. या स्तरांमधील असामान्यता विशिष्ट थायरॉईड विकार ओळखण्यात मदत करू शकतात.
थायरॉईड प्रतिपिंड चाचण्या: या चाचण्या हाशिमोटो रोग किंवा ग्रेव्हस रोग यांसारख्या स्वयंप्रतिकार थायरॉईड विकारांचे निदान करण्यात मदत करतात, जिथे रोगप्रतिकारक शक्ती थायरॉईडवर हल्ला करते.
थायरॉईड अल्ट्रासाऊंड: अल्ट्रासाऊंड थायरॉईड ग्रंथीची तपशीलवार प्रतिमा दाखवू शकते, आणि त्यामुळे संरचनात्मक विकृती किंवा गाठी ओळखण्यात मदत करते.
किरणोत्सर्गी आयोडीन अपटेक (RAIU) चाचणी: ही चाचणी थायरॉइडच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते आणि ग्रेव्हज रोगामध्ये आढळून आल्याप्रमाणे, थायरॉईड अतिक्रियाशील आहे की नाही हे निर्धारित करण्यात मदत करू शकते.
थायरॉईडच्या कार्यात अनियमितता आल्याची चिन्हे आणि लक्षणे ओळखणे आणि आवश्यक चाचण्या घेणे लवकर निदान आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी महत्वाचे आहे. तुम्हाला थायरॉईडच्या समस्यांची शंका असल्यास, थायरॉईडचे आरोग्य आणि एकूणच संपूर्ण शरीराची तपासणी करून आरोग्य पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी आणि वैयक्तिक उपचार योजनेसाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या.